मुंबई: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्त नोंदणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता दस्त नोंदणीकरिता आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. जर दस्त करणाऱ्या पक्षकारांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांच्या दस्ताची नोंदणी होणार नाही. दस्तनोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाचं राजपत्र जारी झालं आहे.
दस्त नोंदणीसाठी आधारकार्ड का अनिवार्य?
मालमत्ता खरेदी विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, तसेच दस्तनोंदणी, जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणांमध्ये खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक हद्दपार होणार. त्यामुळे दस्तनोंदणी प्रक्रिया आणखी पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. यात खरेदी, विक्री, बक्षीस, गहाण, वाटणीसह 63 प्रकारच्या नोंदीसाठी आधार ओळखपत्र सक्तीचे असेल.
दस्त नोंदणी का गरजेची आहे?
दस्त नोंदणी म्हणजे तुम्ही केलेला कोणताही महत्त्वाचा व्यवहार (जसे की घर खरेदी, जमीन खरेदी, भाडेकरार, बक्षीसपत्र) हा सरकारच्या दप्तरी अधिकृतपणे नोंद करणे.
1. कायदेशीर पुरावा: भविष्यात कोणीही “ही जागा माझी आहे” असं म्हणू शकत नाही. तुमच्याकडे सरकारी पुरावा असतो.
2. फसवणूक टळते: एकाच प्रॉपर्टीची दोनदा विक्री होण्यासारखे प्रकार टळतात.
3. बँक लोन: घरावर लोन घ्यायचं असेल तर नोंदणीकृत दस्त बँकेला दाखवावा लागतो
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.