राज्यात गुन्हेगारीची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. गुन्हेगारांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरलेला नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. क्षुल्लक कारणांवरून वाद वाढत असून, त्याचे रूपांतर थेट हिंसाचारात होत आहे. असाच काहीसा प्रकार बुलढाण्यातून समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात किरकोळ भांडणातून थेट तरुणाची हत्या करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात लग्नात डीजेमध्ये नाचत असताना धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बर्डे प्लॉट परिसरात घडली आहे. 23 वर्षीय शोएब खान अमीन खान असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून एका लग्न समारंभामध्ये सुरू असलेल्या डीजेवर नाचत असताना शोएबचा एका युवकाला धक्का लागला, आणि याच क्षुल्लक कारणावरून वाद उफाळून आला.
हा वाद इतका टोकाला गेला की काही जणांनी मिळून शोएबवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याला जीवे मारले. हा हल्ला इतका भीषण होता की, शोएब खान याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.