धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. धुळे शहराचे माजी आमदार डॉ.फारुक शहा हे आपल्या 8 नवनिर्वाचित नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. गोरगरिबांना मदत मिळत नसल्याने आणि विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने नगरसेवकांमध्ये पक्षाविषयी नाराजी आहे. वरिष्ठांकडे वारंवार मागणी करूनही धुळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी फारुक शहा यांनी एमआयएममधून अजित पवार गटात प्रवेश केला होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 8 जागा जिंकल्या होत्या. अशातच आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील रामराम ठोकणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासंबंधी लवकरच बैठक घेऊन दुसऱ्या कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेतला जाणार असून, यामुळे अजित पवार गटाला धुळ्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.