एकतर्फी प्रेमातून अनेकदा तरुण-तरुणी भावनेच्या भरात टोकाचे आणि धोकादायक पाऊल उचलतात. समोरच्या व्यक्तीने आपलं प्रेम स्विकारलं नाही म्हणून निराशा, राग किंवा असंतोष वाढून त्यातून वाद, हल्ले किंवा आत्मघातकी पावले उचलल्याच्या घटना अधूनमधून समोर येतात. अशातच पुण्यातील जुन्नरमधून एक खळबळ घटना समोर आली आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने आधी तरुणीवर जीवघेणा हल्ला केला त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
महेश डामसे या तरुणाचे जुन्नरमधील एका वस्तीगृहात राहणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. त्याने त्या तरुणीला लग्नाची मागणी घालताच त्या मुलीने महेशला स्पष्ट नकार दिला. त्याच रागाच्या भरात महेशने त्या तरुणीवर जीवघेणा हल्ला केली. बुधवारी ती तरुणी वस्तीगृहातून कॉलेजमध्ये जात असताना एका सरकारी रुग्णालयाच्या मागे महेशने तरुणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने वार केले. या भीषण हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि गंभीर जखमी झाली. त्यानंतर महेशने घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर बाब म्हणजे, तरुणीवरील हल्ल्यानंतर जुन्नर पोलिसांकडून महेशचा शोध घेण्यात येत असताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. आज 13 मार्चला सकाळी एका टेकडीवर महेशची गाडी आढळली, जवळच असलेल्या एका झाडाला महेशने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेनं जुन्नर तालुका हादरून गेल असून हल्लेखोराचा अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.