सोलापूर : सोलापूरमध्ये दूषित पाणी प्यायल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. तर 40 ते 50 जणांना उलट्या – जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील एस बी आयकॉन अपार्टमेंटमधील 40 ते 50 रहिवाशांना दूषित पाणी प्यायल्याने हा त्रास होत असल्याचे समजते. बोरच्या पाण्यात गटारीचे पाणी मिक्स होत असल्याने हा गंभीर प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एकाच अपार्टमेंटमधील अनेकांना त्रास होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर उलटी, जुलाब, पोटदुखीचा त्रास होणाऱ्या नागरिकांवर महापालिका आरोग्य विभागाकडून उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, आसरा परिसरातील एसबी प्लाझा या इमारतीमध्ये दूषित पाणीपुरवठा झाल्याने येथील 40 जण शहरातील विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यातील एका महिलेच्या अखेर उपचारादरम्यान गुरुवारी मृत्यू झाला. आफरीन मुजफ्फर शेख (49) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यावर यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दूषित पाणी पिल्यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास मागील तीन दिवसापासून होत होता. याच कारणाने त्यांचा मृत्यू झाला आहे, अशी नोंद त्यांच्या डिस्चार्ज कार्डमध्ये आहे. या इमारतीमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा तक्रारी नागरिकांनी अनेक वेळेस केल्या होत्या. पण याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच हा बळी गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.