अजेष नाडकर. प्रतिनिधी. रायगड: तिथीनुसार किल्ले रायगडावर 9 जून रोजी 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ध्वजारोहणने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, त्यानंतर, वाजत गाजत शिव पालखी राज सदरेवर येईल. त्यानंतर राज सदरेवर प्रकाशस्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारात राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल. यामध्ये, छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक केला जाईल. मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला सुवर्णमुद्रांचा अभिषेक केला जाईल. मुख्य सोहळ्यानंतर, छत्रपती शिवरायांच्या समाधीपर्यंत पालखी मिरवणूक निघेल. समाधीला मानवंदना झाल्यानंतर सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. यादरम्यान, मेघडंबरी आकर्षक फुलांनी सजवण्यात आली आहे.