नांदेडच्या देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मांसाहारी भोजनातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोजन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या देगलूर येथील रुग्णालयात 25 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेमुळे आश्रमशाळेतील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या आहारासाठी शासनाकडून निधी आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
तरी देखील भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर नियमित देखरेख होते का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान भोजनात वापरण्यात आलेले चिकन तसेच तयार भोजनाचे नमुने तातडीने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. या तपासणीनंतर विद्यार्थ्यांना नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे स्पष्ट होणार आहे.