Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या मुलाने दाजींचे कान पिळले आणि मागितली ‘ही ‘ भेटवस्तू; व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले

कीर्तनातून साधेपणाचा मंत्र देत, 'लग्नात मोक्कार पैसा खर्च करू नका' असे ठासून सांगणाऱ्या महाराजांच्या लेकीचा विवाहसोहळा अक्षरशः डोळे दीपवणारा ठरला.

Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या मुलाने दाजींचे कान पिळले आणि मागितली ‘ही ‘ भेटवस्तू; व्हिडीओ पाहून सगळेच चक्रावले

संगमनेर: 'लेकी बोले सुने लागे' या म्हणीप्रमाणे नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कडू-गोड डोस पाजणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कीर्तनातून साधेपणाचा मंत्र देत, 'लग्नात खूप पैसा खर्च करू नका' असे ठासून सांगणाऱ्या महाराजांच्या लेकीचा विवाहसोहळा अक्षरशः डोळे दीपवणारा ठरला. संगमनेरमध्ये पार पडलेल्या या शाही विवाहसोहळ्याची भव्यता, दिग्गजांची उपस्थिती आणि त्यातील 'कानपिळी'चा एक गमतीशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

संगमनेर जवळील गुंजाळवाडी परिसरात तब्बल 100 एकरांच्या विस्तीर्ण मैदानावर ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची शाही सुरुवात झाली. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि बड्या नेत्यांनी या विवाहाला आवर्जून उपस्थिती लावून नवदांपत्याला आशीर्वाद दिले. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ एका कुटुंबाचा न राहता संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील चर्चेचा प्रमुख विषय बनला.

या भव्य लग्नसोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे तिथे मांडण्यात आलेले 'पारंपारिक रुखवत'. आधुनिकतेच्या युगातही ग्रामीण संस्कृतीचा अस्सल बाज, शेतीशी निगडित जिवंत वाटणारे देखावे आणि पारंपरिक विधींचे हुबेहूब सादरीकरण या रुखवतातून मोठ्या कल्पकतेने करण्यात आले होते. याशिवाय, नवरदेव आणि नवरीची शाही एन्ट्री उपस्थितांची मने जिंकून गेली. आधुनिक थाट आणि पारंपरिक मूल्यांचा हा सुरेख मेळ उपस्थितांचे डोळे पारणे फेडणारा होता.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर हादरलं! बँक अधिकारी असल्याचे भासवून सायबर ठगांनी लुटले लाखो रुपये

लग्नातील या झगमगटाबरोबरच सध्या सोशल मीडियावर एका खास व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रीयन विवाहपद्धतीत 'कानपिळी' या विधीला एक वेगळेच भावनिक आणि मिश्किल महत्त्व असते. नवरीचा भाऊ लाडक्या बहिणीच्या नवऱ्याचे कान पिळतो आणि तिला आयुष्यभर खुश ठेवण्याची गोड तंबी देतो. मात्र, इंदुरीकर महाराजांच्या जावयाच्या कानपिळीच्या वेळी एका रंजक प्रसंगाने रंगत वाढवली. महाराजांच्या लेकाने मेहुण्याचे कान पिळताना गमतीने चक्क 'फॉर्च्युनर' गाडीची भलीमोठी मागणी केली. हा मिश्किल प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो व्हिडीओ आता इंटरनेटवर वाऱ्यासारखा पसरत आहे.

एकीकडे या सोहळ्याचे कौतुक होत असताना, दुसरीकडे मात्र दबक्या आवाजात टीकेची झोडही उठत आहे. "लग्नावर अवाढव्य खर्च करू नये," असे सांगून आयुष्यभर प्रबोधन करणाऱ्या महाराजांवर आता त्यांच्याच शब्दांवरून बोट ठेवले जात आहे. 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण' या उक्तीचा आधार घेत अनेक नेटकरी समाजमाध्यमांवर महाराजांना साधेपणाचा विसर पडला का? असा रोखठोक सवाल करत आहेत. मात्र, बापलेकीच्या प्रेमापोटी आणि सामाजिक प्रतिष्ठेपोटी झालेला हा 100 एकरातील भव्य विवाहसोहळा आणि त्यातील 'फॉर्च्युनर'वाली कानपिळी सध्या महाराष्ट्राच्या घराघरांत चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय ठरली आहे, हे मात्र निश्चित! 

हेही वाचा: CSK Vs DC IPL 2026: संजू सॅमसन नावाचं वादळ घोंगावलं! दिल्लीच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी; CSK चा शानदार विजय

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number