आज नाशिक शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज वर्तावण्यात आला असून सकाळपासून शहर व परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. तर जिल्ह्यात काही भागांना रेड अलर्ट आणि काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरात वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. यादरम्यान त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचेही नाव घेत छगन भुजबळ यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूवर संताप व्यक्त केला. त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, "मी काल नाशिकला आल्यापासून रस्त्यांवरील खड्ड्यांच्या बातम्या पाहत आहे. कोतकर यांच्या मृत्यूसह आतापर्यंत पाच जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे. कुंभमेळ्यासाठी रस्ते खोदले असतील तर पर्यायी रस्ता व्यवस्थित ठेवला पाहिजे. काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी रस्ते खोदल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पाऊस थांबताच तातडीने खड्डे बुजवले पाहिजेत. अन्यथा अपघात अटळ आहेत. याला जबाबदार कोण? महापालिका की कुंभमेळा प्राधिकरण, हे स्पष्ट झाले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही. महापौरांचेही कोणी ऐकत नसल्याचे ऐकायला मिळत आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नात लक्ष घालावे. कुंभमेळा नाशिकमध्ये व्हावा, पण तो नागरिकांच्या जीवावर बेतता कामा नये."
नाशिक शहर वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती
"नाशिकमध्ये इतकी वाईट परिस्थिती यापूर्वी कधीच नव्हती. नगरसेवक वैतागले आहेत. शहर वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे. हा विषय मी मंत्रिमंडळ बैठकीत आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. पाऊस थांबल्यावर लगेच खड्डे बुजवावेत. पुन्हा पडले तर पुन्हा भरावेत, पण लोकांचे जीव जाऊ देऊ नयेत. हलगर्जीपणामुळे नागरिकांचे जीव गेले आहेत. प्रवीण गेडाम हे सक्षम अधिकारी आहेत. त्यांनी आपले अधिकार वापरले पाहिजेत. त्यांनी कारवाई केली नाही तर तेही अपयश मानले जाईल. सुंदर नाशिकमध्ये अशी परिस्थिती पाहून, एक नाशिककर म्हणून मला खूप वाईट वाटते. अधिकारी डोळेझाक करत असतील तर कारवाई कशी होणार? कुंभमेळा मंत्री, प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे. मी दोन वेळा मुंबईचा महापौर होतो. प्रत्येक गोष्टीची अंतिम जबाबदारी महापालिकेवरच असते. महापालिकेचे काम नसेल तरी प्राधिकरणाशी समन्वय साधणे महापालिकेचे कर्तव्य आहे. एक वीट हलवायची असली तरी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; इतिहास आपल्यासमोर आहे. महापौरांपेक्षा मनपा आयुक्त, प्राधिकरण आयुक्त आणि कुंभमेळा आयुक्तांकडे अधिक अधिकार आहेत; त्यांनी निर्णय घ्यावेत. जनतेमध्ये असंतोष निर्माण होण्यापूर्वी ठोस उपाययोजना कराव्यात."
बऱ्याच वर्षानंतर या विभागला जाग आला आहे
पुढे तुकाराम मुंढेच्या कारवाईवर बोलताना भुजबळ म्हणाले की, "बऱ्याच वर्षानंतर या विभागला जाग आली आहे. तुकाराम मुंढे हे कारवाई करणारे अधिकारी आहेत. काहींना ते कठोर वाटत असले तरी लोकांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कारवाईला माझा पूर्ण पाठिंबा आहे. जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये आजार वाढत आहेत, त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. माझं पूर्ण पाठिंबा तुकाराम मुंढे यांना आहे."