पुण्यात रेल्वे रुळ ओलांडताना एका महिलेचा जीव थोडक्यात बचावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पुणे विभागातील पाटस रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाची अपुरी व्यवस्था प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
आज एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक मालगाडीला सिग्नल मिळाल्याने थरारक प्रसंग घडला. प्रसंगावधान राखत महिलेने ट्रॅकवर झोपून स्वतःचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या पुढील दोन रेल्वे रुळांवर अद्याप पुलाची सुविधा नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून रुळ ओलांडावे लागत आहेत. यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.