Sunday, March 08, 2026 01:14:46 PM

Ahilyanagar Mayor : अहिल्यानगरच्या महापौरपदी ज्योती गाडे तर उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड

या निवडीमुळे शहराच्या राजकारणात विखे आणि जगताप यांच्यातील 'युती'चे नवे समीकरण अधिक घट्ट झाल्याचे दिसून येत आहे.

ahilyanagar mayor  अहिल्यानगरच्या महापौरपदी ज्योती गाडे तर उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड

Ahilyanagar Mayor : अहिल्यानगर शहराच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती गाडे आणि उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे शहराच्या राजकारणात विखे आणि जगताप यांच्यातील 'युती'चे नवे समीकरण अधिक घट्ट झाल्याचे दिसून येत आहे.

सत्ता वाटपाचा 'सव्वा वर्षाचा' फॉर्म्युला
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सत्तास्थापनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. पहिल्या अडीच वर्षांपैकी सव्वा-सव्वा वर्षांसाठी हे पदाधिकारी निवडले गेले आहेत. पहिले अडीच वर्षे महापौरपद राष्ट्रवादीकडेच राहील, मात्र पुढील अडीच वर्षांसाठी भाजप या पदावर दावा सांगू शकते, असे संकेत विखे पाटील यांनी दिले आहेत.

कर्डिले-जगताप-विखे राजकीय त्रिकोण
या निवडीमागे मोठे राजकीय संदर्भ दडलेले आहेत. नवनियुक्त महापौर ज्योती गाडे या भाजपचे दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या मेव्हणी आहेत. उपमहापौर धनंजय जाधव हे पालकमंत्री विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, कर्डिले कुटुंबात महापौरपद देऊन भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघात नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी 'फील्डिंग' लावली आहे.

हेही वाचा - Mayor List 2026 : राज्यातील आठ मोठ्या शहरांना मिळाले नवे 'कारभारी'; भाजप अन् महायुतीचे वर्चस्व कायम

दोन्ही पदाधिकारी उच्चशिक्षित
दरम्यान, ज्योती गाडे या कला शाखेच्या पदवीधर (B.Ed.) असून प्रभाग 3 मधून मोठ्या मताधिक्याने दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तर धनंजय जाधव हे विधी शाखेचे पदवीधर (LL.B.) असून त्यांना प्रभाग 5 मधून साडेसात हजार मते मिळाली आहेत. ते माजी उपनगराध्यक्ष दिवंगत कृष्णा जाधव यांचे पुत्र आहेत.

शहराच्या विकासाची 'ब्ल्यू प्रिंट'
पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, आमदार संग्राम जगताप आणि सुजय विखे मिळून शहराच्या विकासाचा आराखडा तयार करणार आहेत. विळद परिसरातील प्रस्तावित एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगाराला प्राधान्य दिले जाईल. महापौर निवडीनंतर कोणताही मोठा जल्लोष न करता अत्यंत साधेपणाने या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. 
 


सम्बन्धित सामग्री