Friday, February 13, 2026 06:56:58 PM

Kalyan Dombivli Election Results 2026: कल्याण डोंबिवलीमधून प्रल्हाद म्हात्रे यांचा विजय; ठाकरे युतीचा 'फॅक्टर' चालला

शिवसेना (उबाठा) - मनसे युतीमुळे मराठी मते एकवटल्याचा थेट फायदा मनसेला झाल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे.

kalyan dombivli election results 2026 कल्याण डोंबिवलीमधून प्रल्हाद म्हात्रे यांचा विजय ठाकरे युतीचा फॅक्टर चालला

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार पुनरागमन करत आपले पहिले खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 21  'अ' मधून मनसेचे उमेदवार प्रल्हाद म्हात्रे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवून 'इंजिना'ची शिट्टी वाजवली आहे. या विजयामुळे मनसेच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, हा विजय आगामी राजकीय बदलांची नांदी मानला जात आहे.

प्रभाग 21  'अ' मध्ये प्रल्हाद म्हात्रे यांची लढत सत्ताधारी महायुतीच्या प्रबळ उमेदवारांशी होती. मात्र, यावेळी निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदललेले पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी मुंबईसह एमएमआर क्षेत्रात 'मराठी अस्मितेच्या' मुद्द्यावर हातमिळवणी केली होती. या 'ठाकरे युती'चा थेट फायदा प्रल्हाद म्हात्रे यांना झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा: BMC Election Results 2026: अजित पवार गटाला मुंबईत 'मोठा धक्का'; नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक पराभूत

जिथे पूर्वी मराठी मतांचे विभाजन होऊन भाजप किंवा इतर पक्षांना फायदा होत असे, तिथे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या समर्थकांची मते एकवटल्याने मनसेला विजय खेचून आणता आला आहे.

मुंबईतही या युतीमुळे अनेक ठिकाणी चुरस निर्माण झाली असून, मराठी बहुल पट्ट्यात 'मराठी माणूस' एकत्र आल्याचा कल निकालांतून स्पष्ट होत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने खाते उघडल्याने आता महापालिकेत सत्तास्थापनेच्या गणितात मनसेची भूमिका कळीची ठरू शकते.

राज्यामध्ये आणि मुंबईत शिवसेना - मनसे युतीचा हा 'फॅक्टर' कितपत प्रभावी ठरतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. प्रल्हाद म्हात्रे यांच्या विजयाने मनसेने केवळ खाते उघडले नसून, विरोधकांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले आहे.

हेही वाचा: Maharashtra Elections Result : एकीकडे फडणवीसांचे मामेभाऊ पराभूत, तर दुसरीकडे मुंबईत नवाब मलिक यांचे भाऊ पराभूत


सम्बन्धित सामग्री