कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने शिरकाव केल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः एका महिलेला कोरोनाची लागण होऊन तिचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलत आरोग्य यंत्रणेला सज्जतेचा इशारा दिला आहे.
महापालिकेच्या बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दहा बेडचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले असून, या वॉर्डमध्ये ऑक्सिजनची सुविधा, आवश्यक औषधे, मास्क, ग्लोज आणि इतर वैद्यकीय साधनांची उपलब्धता करण्यात आली आहे. याशिवाय, या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांना अद्ययावत उपचार देण्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ नेमण्यात आला आहे.
कोरोनाच्या नव्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांना अलर्टवर ठेवले आहे. तसेच, नागरिकांनी कोणतेही लक्षण दिसल्यास तात्काळ तपासणी करून आवश्यक उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याशिवाय, नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा: Budha Uday 2025: 12 महिन्यांनंतर बुधाचा मिथुन राशीत उदय; 'या' 3 राशींच्या लोकांना होईल मोठा फायदा ,आर्थिक समृद्धी आणि संपत्ती वाढीची शक्यता
कल्याण डोंबिवली शहरात मागील काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या लक्षणांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही परिस्थिती गांभीर्याने घेत महापालिकेने शहरात पुन्हा एकदा कोविड टेस्टिंग सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे. काही भागांमध्ये सॅनिटायझेशन मोहीमही राबवली जात आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर, नर्स आणि संपूर्ण यंत्रणा पुन्हा एकदा कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. नागरिकांनी देखील यामध्ये महापालिकेस सहकार्य करावे, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच स्वीकारावी, असे आवाहन महापालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.
सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत असले तरी, भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रशासन कोणतीही रिस्क घेत नाही. मागील अनुभव लक्षात घेता आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत राबवण्यावर भर दिला जात आहे. कोरोना विरोधातील ही लढाई पुन्हा एकदा एकजुटीने लढण्याची वेळ आल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.