पुणे: 3 फेब्रुवारीचा तो त्रासदायक मंगळवार पुणे-मुंबई प्रवाशांच्या विस्मरणामधून जाणे कठीण आहे. खंडाळा घाटातील अदोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन वायू वाहून नेणाऱ्या टँकरने घेतलेली पलटी केवळ वाहनांची गती थांबवून गेली नाही, तर हजारो प्रवाशांच्या सहनशक्तीची 'अग्निपरीक्षा' घेणारी ठरली. तब्बल 50 किलोमीटरपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा आणि तासनतास अडकलेली जिवांची घालमेल, अशा परिस्थितीतही ज्यांच्या खिशातून 'फास्टॅग'च्या माध्यमातून टोल ओरबडला गेला, त्यांना आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मोठा दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत.
दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या त्या भीषण अपघातानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. रस्ता पूर्णपणे ठप्प असताना आणि हजारो नागरिक महामार्गावर तहान-भुकेने व्याकुळ झालेले असताना, टोल नाक्यांवरील 'ऑटोमॅटिक' यंत्रणा मात्र प्रवाशांच्या बँक खात्यावर 'डल्ला' मारत होती. रस्ता बंद असूनही टोल वसुली सुरू राहिल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. नियमानुसार, रस्ता सेवा उपलब्ध नसेल तर टोल आकारणे अनैतिक आहे, याच मुद्द्यावरून आता प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरले आहे.
हेही वाचा: Gold Price Crash: रेकॉर्ड ब्रेक उच्चांकानंतर सोन्याला मोठा धक्का; अवघ्या एका आठवड्यात हजारोंची घसरण, आता भाव 1 लाखांच्या खाली जाणार?
याप्रकरणी एमएसआरडीसीने आक्रमक पवित्रा घेत टोल संकलक 'आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर'ला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बॅरिअर्स बंद असतानाही फास्टॅगद्वारे व्यवहार कसे झाले, याचा जाब विचारण्यात आला असून 3 फेब्रुवारीच्या त्या ठराविक काळातील सर्व व्यवहारांचा डेटा मागवण्यात आला आहे. कोणत्या वाहनचालकाच्या खात्यातून किती रक्कम कपात झाली, याची पडताळणी आता युद्धपातळीवर सुरू आहे. अडथळ्याच्या काळात टोल वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही झालेल्या या हलगर्जीपणामुळे कंत्राटदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे.
एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, "भीषण कोंडीच्या काळात वसूल करण्यात आलेला टोल प्रवाशांना परत करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला, तरी प्रशासन त्याबाबत अत्यंत सकारात्मक आहे." आयआरबीकडून प्राप्त होणाऱ्या माहितीची छाननी केल्यानंतर, तांत्रिक प्रक्रियेद्वारे हा परतावा थेट प्रवाशांच्या फास्टॅग खात्यात जमा करण्याचे नियोजन सुरू आहे. यंत्रणेतील या त्रुटीमुळे प्रवाशांना नाहक आर्थिक फटका बसला असून तो भरून काढण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे.
मुळात 'टोल' म्हणजे वेळेची बचत आणि सुलभ प्रवासासाठी दिलेले मूल्य असते. जेव्हा 50 किलोमीटरच्या रांगा लागतात आणि प्रवाशांचे अनेक तास महामार्गावरच खर्ची पडतात, तेव्हा वसुलीचा हट्ट धरणे हे संतापजनकच आहे. या निर्णयामुळे भविष्यात अशा आपत्कालीन स्थितीत टोल वसुली आपोआप थांबवण्यासाठी एक नवा पायंडा पडण्याची शक्यता आहे. 'देर आए दुरुस्त आए' या उक्तीप्रमाणे, प्रवाशांना मिळणारा हा परतावा त्यांच्या मानसिक त्रासाची पूर्ण भरपाई करू शकला नाही, तरी त्यांच्या ग्राहक हक्काच्या विजयाचे एक महत्त्वाचे प्रतीक नक्कीच ठरेल.
हेही वाचा: Youtube Down: यूट्यूब ठप्प! जगभरातील लाखो युजर्समध्ये मोठी खळबळ, तुम्हीही सामोरे जाताय या अडचणीला?