Ladki Bahin Yojana September Installment: महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर आता राज्यातील लाखो महिला सप्टेंबर महिन्याच्या सन्मान निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता वितरित करण्याची तयारी राज्य सरकारकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबरनंतर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे सप्टेंबरचा निधी जमा होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.
गणेशोत्सवानंतर आता दसरा-दिवाळीचा मुहूर्त
यापूर्वी राज्य सरकारने रक्षाबंधन आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर वेळेत पैसे वर्ग केले होते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरपासून सुरू झाली होती आणि 2 ऑक्टोबरपर्यंत बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. आता दसरा आणि आगामी दिवाळी सणाचा विचार करता, सणासुदीच्या काळात महिलांच्या हाताला आर्थिक बळ मिळावे या उद्देशाने सरकारकडून सप्टेंबरचा हप्ता 25 ऑक्टोबरच्या आसपास जमा करण्याचे नियोजन केले जात आहे.
हेही वाचा – पीएम किसानच्या 24 व्या हप्त्यापूर्वी पोर्टलवरील ‘हे’ बदल जाणून घ्या; शेतकऱ्यांनी आताच चेक करा
अधिकृत घोषणेकडे महिलांचे लक्ष
सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्यातील सुमारे 1 कोटी 66 लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1,500 रुपये जमा होतील. ही रक्कम थेट महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. सध्या 25 ऑक्टोबरनंतर हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी राज्य सरकारकडून यासंदर्भातील अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सरकारची अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.