लातूर: निसर्ग, नियती, सरकार सगळ्यांनी फसवलं... हीच गत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची झाली आहे. त्यात गरीबी, वाढता शेतीखर्च यामुळं शेतकऱ्याची आणखी परवड झालीये. मशागतीसाठी पैसे नसल्यानं लातूरच्या अंबादास पवार या वृद्ध शेतकऱ्याला स्वत:ला नांगराच्या औताला जुंपण्याची वेळ आली . स्वतःच औताला जुंपून शेतात त्यांनी मशागत केली.
वयाची पासष्टी गाठलेले शेतकरी अंबादास पवार हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील आहेत. आपल्याच शेताची मशागत ते करत आहेत. उभी हयात शेतात राबण्यात गेली. उतरणीचं वय झालं तरी अंबादास यांनी स्वत:ला औताला जुंपलंय. पावसाळा सुरू झालाय. त्यामुळं शेतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. एकीकडे शेतीत आधुनिकतेचा वापर होत असतानाच हाडोळती गावातील रहिवासी असेलल्या अंबादास यांना आपल्या म्हाताऱ्या खांद्यावर नांगर घेण्याची वेळ का बरं आली असावी. असं विचारताच अंबादास यांचं उत्तर काळजाला चटका लावून जातं.
हेही वाचा: महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात; बाळा बांगर यांचा आरोप
अंबादास पवार यांच्याकडं अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. शेतीच्या मशागतीसाठीचा खर्च परवडत नसल्यानं या वृद्ध दाम्पत्याने स्वतःच्या खांद्यावर नांगर घेऊन शेत नांगरली. एकीकडे सरकार विविध योजना राबवत आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही आहेत. पण सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र निराशा झाली आहे. मागील दोन तीन वर्षापासून आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचं उत्पादन आणि उत्पन्न घटलं. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कृषिप्रधान भारताचं हेच वास्तव आहे. हा मुद्दा अधिवेशनातही विरोधकांनी उचलून धरला आहे. तर कृषीमंत्र्यांनी अंबादास यांची दखल घेत मदतीचं आश्वासन दिलं आहे.