अजय घोडके, लातूर: लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील शहर कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर कलवले व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांच्या अनागोंदी, नियमबाह्य कारभाराचे धक्कादायक प्रकार दिवसेंदिवस समोर येत असून आता महापालिकेचे हे दोन अधिकारी आपल्याच विभागाच्या माजी सहाय्यक आरोग्य संचालक डॉ. प्रीती बादाडे यांच्यावर मेहरबान झाल्याचे चित्र लातूर शहरात सध्या दिसून येत आहे.
लातूर शहर महानगरपालिकेचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर कलवले यांनी आपल्या पगारात 5 टक्के वाढ करून घेण्यासाठी स्वतःच्या मूल्यांकन अहवालावर (Performance Report) लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व लातूर शहर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अमन मित्तल या दोन सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी व शिक्का मारुन शासन व प्रशासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार फेब्रुवारी, 2024 मध्ये उच्चस्तरीय चौकशी समितीने शासनाला दिलेल्या अहवालात समोर आला आहे.
हेही वाचा:भावासाठी ट्विट केलं, पण नंतर डिलीट केलं? निलेश राणे म्हणाले, 'त्याने मला अधिकार...
याच तीन सदस्यीय चौकशी समितीत तत्कालीन सहाय्यक आरोग्य संचालक डॉ.प्रीती बादाडे यांचा समावेश होता. चौकशी समितीचा अहवाल फेब्रुवारी 2024 मध्ये शासनाला सादर झाला आणि अवघ्या दोन महिन्यात तत्कालीन सहाय्यक आरोग्य संचालक डॉ.प्रीती बादाडे यांच्या लातूर शहरातील निवासस्थानी दोषी अधिकारी रामेश्वर कलवले, डॉ. शंकर भारती या अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 'नागरी आयुष्यमान आरोग्य केंद्र' सुरु केले आहे. ज्याचे लाखो रुपयांचे भाडे दरमहा लातूर महापालिकेकडून अदा केले जात आहे.
बनावट स्वाक्षरी करून शासन प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी रामेश्वर कलवले दोषी असल्याचा अहवाल चौकशी समितीने फेब्रुवारी,2024 मध्ये शासनाला सादर केला. रामेश्वर कलवले या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असताना दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी रामेश्वर कलवले अद्याप महापालिकेत पदावर कार्यरत आहेत. त्यामुळेच केलेल्या मदतीची परतफेड म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागातील रामेश्वर कलवले, डॉ. शंकर भारती हे दोन अधिकारी तत्कालीन सहाय्यक आरोग्य संचालक डॉ.प्रीती बादाडे यांच्यावर मेहरबान झाल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात होत असून तशी शंका स्वराज्य पक्षाने शासनाला दिलेल्या निवेदनात उपस्थित केली आहे. त्यामुळे रामेश्वर कलवले या दोषी अधिकाऱ्याच्या बचावासाठी पडद्यामागे सुरू असलेल्या घडामोडींचे नवे संदर्भ,दाखले दिवसेंदिवस उघड होताना दिसत आहेत.

- रामेश्वर कलवले, शहर कार्यक्रम व्यवस्थापक, लातूर शहर महापालिका

-डॉ.शंकर भारती, आरोग्य अधिकारी, महापालिका, लातूर

-डॉ. प्रीती बादाडे, माजी सहाय्यक आरोग्य संचालक, लातूर विभाग