लातूर अजय घोडके, प्रतिनिधी : लातूर तालुक्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या पत्नी सरोजा सौदागर तांदळे यांच्या खासगी मालकीच्या भूखंडावरील बांधकामाबाबत सामाजिक कार्यकर्त्याने लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाकडे पुराव्यासह लेखी तक्रार केली असून संबंधित बांधकाम करताना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 तसेच विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) मधील तरतुदींचा भंग झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, नगर विकास विभागाचे तत्कालीन उपसचिव निर्मलकुमार चौधरी यांनी दि.25 फेब्रुवारी, 2025 रोजी राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणे, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध करून नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याबाबत निर्देश दिले असून या पार्श्वभूमीवर तक्रार करूनही संबंधित बांधकामावर लातूर शहर महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
प्रशासनाने तातडीने बांधकामाची पाहणी करून मंजूर नकाशा, परवाना आणि प्रत्यक्ष बांधकाम यांची पडताळणी करुन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाला दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्त्याने दिला आहे. या प्रकरणात सरोजा सौदागर तांदळे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. दरम्यान, शासकीय यंत्रणेतील महत्त्वाच्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावरील बांधकामाबाबत तक्रार झाल्याने सौदागर तांदळे यांनी 'तहसीलदार' या पदाचा गैरवापर केला आहे का? याची सखोल तपासणी करुन या प्रकरणात सामान्य नागरिकांमाणेच नि:ष्पक्षपणे चौकशी करून शासनाचे नियम डावलून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्तींवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.