Latur ZP Election: लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली असून, निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद सर्कलमधील काँग्रेसच्या महिला उमेदवार अंजना सुनील चौधरी या पतीसह बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण तापले आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, २४ जानेवारी रोजी अंजना चौधरी या उदगीर येथील बिदर रोड परिसरात एका मैत्रिणीच्या घरी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्या प्रचारासाठी जाणार होत्या, मात्र त्याआधीच काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून पळवून नेल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
या कथित अपहरणामागे सत्ताधारी भाजपच्या आमदारांच्या समर्थक गुंडांचा हात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक लढवण्याऐवजी दहशतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत, काँग्रेसने या घटनेला लोकशाहीवरचा थेट हल्ला असल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे, अंजना चौधरी या अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवरून निवडणूक लढवत होत्या. आधीच या प्रवर्गात पात्र उमेदवार मिळणे कठीण असताना, अशा प्रकारे उमेदवाराचे अपहरण होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, अंजना चौधरी यांचे पती सुनील चौधरी हेही घरी आढळून न आल्याने त्यांचाही या अपहरणात समावेश असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही घटना अधिकच गंभीर बनली आहे. कुटुंबीय आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, उमेदवाराच्या सुरक्षिततेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन तक्रार दिली असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्र्यांकडेही निवेदन सादर करण्यात आले आहे. आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून उमेदवार आणि त्यांच्या पतीचा शोध घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, येत्या काळात या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.