Saturday, June 14, 2025 04:34:16 AM

लातूरच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य उपसंचालकाच्या आदेशाला केराची टोपली

लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शंकर भारती यांची फेब्रुवारी 2025 मध्ये बदली करण्यात आली. परंतु तीन महिने उलटले तरी डॉ. शंकर भारती हे अहमदपूर येथे रुजू झाले नाहीत

लातूरच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याकडून आरोग्य उपसंचालकाच्या आदेशाला केराची टोपली

अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शंकर भारती यांची फेब्रुवारी 2025 मध्ये अहमदपूर येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली असून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना किर्दक भोसले यांनी दि. 27 फेब्रुवारी, 2025 रोजी लेखी आदेश काढले आहेत. परंतु तीन महिने उलटले तरी डॉ. शंकर भारती हे अहमदपूर येथे रुजू झाले नाहीत. त्यामुळे लातूर शहर महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून ठाण मांडून बसलेले  डॉ. शंकर भारती हे विभागीय आरोग्य उपसंचालकांच्या आदेशाला जुमानत नसून मागील तीन महिन्यापासून त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील डॉ.शंकर भारती व रामेश्वर कलवले यांच्या मनमानी, नियमबाह्य, भ्रष्ट  कारभाराच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी लातूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील या दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी शासनाला निवेदनाद्वारे केली. आता डॉ. शंकर भारती या अधिकाऱ्याची तीन महिन्यापूर्वी अहमदपूर येथे आरोग्य उपसंचालकाने लेखी आदेश काढून केलेल्या बदलीचे पत्र समाज माध्यमात व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया 15 जूनपासून सुरू

लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना किर्दक भोसले यांनी स्वतः लेखी आदेश काढून डॉ. शंकर भारती यांची अहमदपूर येथे बदली करूनही डॉ. शंकर भारती मागील तीन महिन्यापासून अहमदपूर येथे रुजू होत नसतील तर आरोग्य उपसंचालकांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का केली नाही ? लातूरचे आरोग्य उपसंचालक मुजोर अधिकाऱ्यांना बळ देत आहेत का ? असा सवाल केला जात असून आरोग्य उपसंचालकांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री