राज्यात आज नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. ४ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्या होत्या. त्याप्रमाणे २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. मात्र २० नगर परिषदा आणि चार नगर पंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.७६ नगर परिषदा, नगर पंचायतींमधील १५४ सदस्यपदांसाठी निवडणूक स्थगित झाली आहे. दरम्यान आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होणार असून, ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहील.
सध्याच्या निवडणुकांमध्ये दुबार मतदारांचा विषय मोठ्या प्रमाणात गाजला आहे. त्यामुळे दुबार मतदार कशाप्रकारे शोधून किती जणांकडून शपथपत्र भरून घेण्यात येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हे मतदार मतदान करण्यास आल्यानंतर त्यांच्याकडून इतर कोणत्याही ठिकाणी मतदान करणार नाही, असे शपथपत्र भरून घेण्यात येणार आहे. त्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे या निवडणुकीत पाहावे लागेल.
यंत्रणा सज्ज
-राज्यातील १२ हजार ३१६ मतदान केंद्रांसाठी ६२ हजार १०८ निवडणूक अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
-मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीही व्यवस्था.
-पुरेशा मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था. एकूण १७ हजार ३६७कंट्रोल युनिट; तर ३४ हजार ७३४ बॅलेट युनिटचा समावेश