PNG Connections: PNG क्रांतीत महाराष्ट्र-गुजरातचा डंका! देशातील निम्म्याहून अधिक गॅस पाइपलाइन जोडण्या केवळ दोनच राज्यांत

31 जानेवारी 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण 16 दशलक्ष (1.6 कोटी) PNG जोडण्या पूर्ण झाल्या आहेत.

PNG Connections: PNG क्रांतीत महाराष्ट्र-गुजरातचा डंका! देशातील निम्म्याहून अधिक गॅस पाइपलाइन जोडण्या केवळ दोनच राज्यांत

PNG Connections: इराणमधील वाढत्या संघर्षामुळे भारताला सध्या LPG (द्रवरूप पेट्रोलियम वायू) तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने नागरिकांना सुरक्षित आणि शाश्वत अशा PNG (पाईप्ड नॅचरल गॅस) कडे वळण्याचे आवाहन केले आहे. 31 जानेवारी 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण 16 दशलक्ष (1.6 कोटी) PNG जोडण्या पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यातील निम्म्याहून अधिक जोडण्या केवळ महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये एकवटल्या असून, दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळ सारखी राज्ये 'शीर्ष 10' राज्यांच्या यादीतून बाहेर फेकली गेली आहेत.

महाराष्ट्र देशात अव्वल; राज्यांची क्रमवारी जाहीर
पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाच्या (PPAC) आकडेवारीनुसार, 4.34 दशलक्ष PNG जोडण्यांसह महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. हे प्रमाण एकूण देशांतर्गत जोडण्यांच्या सुमारे 26 टक्के इतके आहे. यानंतर 3.78 दशलक्ष जोडण्यांसह गुजरात दुसऱ्या, तर 2.12 दशलक्ष जोडण्यांसह उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे. 

एका महिन्यात 8 लाख नवीन ग्राहक; LPG कपातीचा सरकारचा निर्णय
सरकारने गेल्या केवळ एका महिन्यात 8 लाख नवीन PNG जोडण्या दिल्याचा दावा केला आहे. याच काळात सुमारे 16,000 हून अधिक ग्राहकांनी आपली LPG कनेक्शन्स स्वेच्छेने परत केली आहेत. सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ज्या घरांमध्ये PNG सुविधा उपलब्ध आहे, त्यांना आता घरगुती LPG सिलिंडर मिळण्यास पात्र धरले जाणार नाही. तसेच, 23 मार्च पासून सरकारी तेल कंपन्यांनी 6,60,000 'छोटू' (लहान आकाराचे) सिलिंडर्स विकून बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

PNG आणि LPG मधील नेमका फरक काय?
PNG म्हणजे 'पाईप्ड नॅचरल गॅस' जो थेट भूमिगत पाइपलाइनद्वारे तुमच्या स्वयंपाकघरात पोहोचतो. हा वायू प्रामुख्याने गॅस फील्ड्समधून मिळवला जातो. याउलट, LPG हा कच्च्या तेलावर प्रक्रिया करून मिळवला जातो आणि तो सिलिंडर्समध्ये भरून वितरित केला जातो. सध्या देशात PNG ग्राहकांची संख्या 16.2 दशलक्ष आहे, तर LPG ग्राहकांचा आकडा 332 दशलक्ष इतका अवाढव्य आहे.

हेही वाचा – Ammonia Gas Crisis: देशावरील संकट वाढतंय! तेल, गॅसनंतर आता अमोनियाचा भडका, एक सिलेंडर 15000 तर…, शीतगृह उद्योग संकटात

आयातीवरील अवलंबित्व आणि भविष्यातील आव्हाने
भारत आपल्या LPG गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर मध्य-पूर्वेकडील देशांवर अवलंबून आहे. हा पुरवठा प्रामुख्याने 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'तून (Strait of Hormuz) होतो, जी सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संवेदनशील बनली आहे. भारताची नैसर्गिक वायूची निम्मी मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते आणि देश दरवर्षी 25 ते 26 दशलक्ष टन LNG आयात करतो. आयातीमधील हा धोका कमी करण्यासाठी सरकार पाइपलाइन नेटवर्कचा विस्तार करण्यावर भर देत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number