राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होत असताना, यंदाही विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 2024 मधील विधानसभा निवडणुकांनंतर 15 वी विधानसभा अस्तित्वात आली. नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन डिसेंबर 2024 मध्ये झाले. परंपरेनुसार पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाते. मात्र यावेळी विरोधी बाकावरील सर्वात मोठ्या पक्षाकडे आवश्यक 10 टक्के सदस्यसंख्या नसल्याने हा मुद्दा प्रलंबित राहिला आहे. विधान परिषदेतही साधारण असेच चित्र दिसून येत आहे.
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हा विषय चर्चेत आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा संबंधित सभापती आणि अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रात येतो, असे स्पष्ट केले होते. सरकारला त्यांच्या निर्णयावर आक्षेप नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. दुसरीकडे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी या संदर्भातील नियमांचा अभ्यास सुरू असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. हे पत्र मार्च 2025 मध्ये देण्यात आले होते. त्याचप्रमाणे विधान परिषदेत काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव सभापतींकडे सादर करण्यात आला होता. मात्र या दोन्ही प्रस्तावांवर अद्याप निर्णय झालेला नाही.