मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत लोकहिताय निर्णय घेण्यात आले. विविध मंत्रिमंडळ निर्णयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे:
महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण 2025-2029 मंजूर
राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या ‘महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण 2025-2029 ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
गावागावात हवामान केंद्रांची उभारणी ; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ
केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ; हयात जोडीदारालाही मिळणार मानधन
सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे. तसेच मानधनधारकाच्या हयात जोडीदारालाही मानधन देण्याचा आणि अन्य काही अटी शिथिल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
हेही वाचा: Today's Horoscope: आज काही राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार,जाणून घ्या
ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी नाशिकमधील जांबुटके येथे 29 हेक्टर 52 आर.जमीन
ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास नाशिक जिल्ह्यातील मौजे जांबुटके (ता. दिंडोरी) येथील 29 हेक्टर 52 आर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्कात सवलत, गुंतवणुकीला चालना, रोजगाराच्या संधी वाढणार
एमएमआरडीए आणि मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटर लि. यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यात प्रकल्प जमिनीशी संबंधित करारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये 50 टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे.
मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क माफ
मुंबईतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठास मौजे पहाडी गोरेगाव येथील जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जमिनीच्या हस्तांतरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विशेष हेतू कंपनीस भाडेपट्टा कराराच्या मुद्रांक शुल्कात सवलत
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी (SPV) आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबईतील मेट्रो मार्ग-2 व 7 प्रकल्पांकरिता वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ
मुंबईतील मेट्रो मार्ग-2 अ (दहिसर पूर्व ते डी.एन.नगर), 2 ब (डी.एन.नगर ते मंडाळे) आणि मेट्रो मार्ग-7 (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) या प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक या वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर
विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
अनिवासी भारतीयांची मुले, पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळणार
राज्यातील खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना अनिवासी भारतीयांच्या मुलांना व पाल्यांना प्रवेश मिळावा याकरिता प्रवेश व शुल्क यांचे विनियमन अधिनियम, 2015 मधील व्याख्येत सुधारणा करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.