Monday, March 09, 2026 01:35:58 AM

फिल्मी स्टाईलने अपहरण; राजस्थान पार्सलचा बनाव फसला, 3 तासांत आरोपी गजाआड, नेमकं काय घडलं?

या घटनेवर वेगाने कारवाई करत शनिपेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी यांची सुटका केली.

फिल्मी स्टाईलने अपहरण राजस्थान पार्सलचा बनाव फसला 3 तासांत आरोपी गजाआड नेमकं काय घडलं

जळगावमध्ये चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी घटना घडली आहे. एक अशी अपहरणाची घटना उघडकीस आली आहे की सर्वच चक्रावले आहेत. राजस्थानहून पार्सल आल्याचा बहाणा करून मामा-भाच्यांचे अपहरण करून तब्बल 20 लाखांची खंडणी मागितल्याची थरारक घटना उघडकीस आली. या घटनेवर वेगाने कारवाई करत शनिपेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तीन तासांत अकोला येथे धडक देत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गणपतलाल माळी यांची सुटका केली. 

जळगाव मधील गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल साहित्य विक्री करणारे कृष्णकुमार चौधरी व त्यांचा भाचा गणपतलाल माळी यांना यश जितेंद्र माकोडे याने फोन करून राजस्थानहून पार्सल आल्याचे सांगितले. ममुराबाद रस्त्यावरील एका दुमजली इमारतीत नेऊन भाच्याला बांधून ठेवण्यात आले, तर मामालाही चाकूचा धाक दाखवत बसविण्यात आले. "तू मला मारण्याची सुपारी दिली" असा खोटा आरोप करत आरोपींनी त्यांना धमकावले. यानंतर दोघांना दुचाकीवरून भुसावळच्या दिशेने नेत अकोल्यात डांबून ठेवण्यात आले. 

हेही वाचा - Namo Shetkari Yojana Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार; तारीख समोर 

भाच्याला ओलिस ठेवत त्याला सोडवायचे असेल तर 20 लाख रुपये घेऊन ये, असा दम देण्यात आला. मात्र प्रसंगावधान राखत कृष्णकुमार चौधरी पहाटे जळगावात पोहोचले आणि थेट शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पहाटेच अकोल्यात सापळा रचत यश माकोडे व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी गणपतलाल यांची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
 


सम्बन्धित सामग्री