1 मे 1960 ही केवळ एक तारीख नव्हे, तर मराठी अस्मितेच्या झंझावातातून उदयास आलेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याची जन्मतारीख या मागे केवळ राजकीय नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक व साहित्यिक संघर्षाची एक प्रदीर्घ परंपरा आहे. तर महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यभरात जल्लोष सुरु आहे चला तर मग त्याचाच एक थोडक्यात आढावा घेऊयात.
मुंबई:
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मालाड पूर्व येथील स्वयंभू गावदेवीची पालखी विधिवत पूजा करून मिरवण्यात आली. संपूर्ण परिसरात भक्तांचा ओघ दिसून आला. तसेच हुतात्मा चौक, मुंबई येथे शिवसेना (ठाकरे गट) च्या आमदार-खासदारांनी अभिवादन केले. यावेळी खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार सुनिल प्रभू यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोला (शास्त्री स्टेडियम):
पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी उपस्थित राहिले. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा विशेष सत्कारही झाला.
चंद्रपूर:
मुख्य ध्वजारोहण सोहळा डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते पार पडला. पोलीस दलाच्या पथसंचलनाने मानवंदना देण्यात आली. उत्सवात शिस्तबद्ध वातावरणात विविध अधिकारी सहभागी झाले.
सांगली (पोलीस मुख्यालय):
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला. पोलिस बंदोबस्त, सांस्कृतिक उपस्थिती आणि जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून आला.
रायगड (चांदे क्रीडांगण, महाड):
मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. विविध खात्याचे अधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शिरूर तालुका (कोरेगाव भीमा):
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ आयोजित कामगार मेळाव्यात अच्युत गोडबोले यांच्या व्याख्यानाने कामगार कायद्यांवरील मार्गदर्शन झाले. विविध क्षेत्रातील लोकांचा सन्मान करण्यात आला, ज्यामुळे मेळाव्यास अर्थपूर्ण व समाजाभिमुख रूप मिळाले.
मालेगाव (ता. चांदवड, नाशिक):
भाटगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयात, कलाशिक्षक देव हिरे यांनी रंगीत फलकद्वारे महाराष्ट्र दिन व कामगार दिन यांचा संदेश दिला. शालेय उपक्रमातून मराठी अस्मितेला रंगीबेरंगी अभिव्यक्ती मिळाली.
जालना:
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ध्वजारोहण करत जातनिहाय जनगणना निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमात सरकारी अधिकारी, विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले.
येवला (तहसील कार्यालय आवार):
आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण. त्यानंतर वृक्षारोपणाचा उपक्रम झाला. प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
बीड (पोलीस मुख्यालय मैदान):
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण. त्यांनी जनतेला मार्गदर्शन करून, महाराष्ट्र दिनाचे महत्व विशद केले.
नागपूर (कस्तुरचंद पार्क):
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन. पोलीस दलाने संचलन करत महाराष्ट्र दिनाचा सन्मान उंचावला.
जळगाव (बोदवड तहसील कार्यालय):
विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
नाशिक (पोलीस संचलन मैदान):
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण. संचलनातून मानवंदना दिली गेली. अद्याप पालकमंत्री जाहीर नसल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी होती.
वाशीम (पोलीस कवायत मैदान):
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण. वीरमाता व वीरपत्नींचा सन्मान, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव, आणि पथसंचलनामुळे उत्सवाला औपचारिक तेज प्राप्त झाले.
पंढरपूर:महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे. यासाठी ब्लू डीजी 1500 गड्डी, स्टेटस 1500 गड्डी, कामिनी 1500 गड्डी, जिप्सो 100 गड्डी, ऑर्किड 5 गड्डी, जरवेरा 20 गड्डी, दस गुलाब 20 गड्डी, झेंडू भगवा 300 किलो, झेंडू पिवळा 300 किलो इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे. सदरची सजावट विठ्ठल भक्त चव्हाण परिवार धायरी गाव, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्र दिन सांस्कृतिक, सामाजिक आणि श्रमसन्मानाने साजरा होतोय. शहरात, गावोगावी, तालुक्यापर्यंत सरकारी अधिकाऱ्यांपासून ते शाळांपर्यंत प्रत्येक स्तरावर अभिमान व्यक्त करण्यात येत आहे.