महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काल महत्त्वाचा दिवस ठरला. कारण महायुती सरकारने अखेर कर्जमाफीची तारीख निश्चित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की, 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल, असं वाटत असतानाच दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सरकारला दिलेला घरचा आहेर चर्चेचा विषय ठरत आहे.
अजितदादांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलं, “सारखं सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं? शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळतं, मग वेळेवर फेडायची सवय लावा ना!” त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. एका बाजूला सरकार कर्जमाफी देऊ म्हणते, आणि दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्रीच शेतकऱ्यांच्या सवयींवर टीका करतात, त्यामुळे सरकारचं नेमकं धोरण काय आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. कर्जमाफीचा विषय पुन्हा चर्चेत आला तो प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे. नागपूरमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठं आंदोलन केलं. त्यांच्या सोबत काही प्रमुख शेतकरी नेते सहभागी झाले, तर काही संघटना अनपेक्षितपणे दूर राहिल्या. या आंदोलनानंतर लगेचच सरकारने मुंबईत वाटाघाटींसाठी प्रतिनिधींना बोलावलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा: हृदयद्रावक! आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; 9 भाविकांचा मृत्यू, दक्षिण भारतातल्या घटनेमुळे खळबळ
पण अजित पवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांनी अगदी सरळ सांगितलं, “2008 मध्ये शरद पवारांच्या काळात कर्जमाफी झाली, 2014 मध्ये फडणवीसांच्या काळात झाली, उद्धव ठाकरे सरकारमध्येही झाली. 2024 मध्ये आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून आम्ही म्हटलं, आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू आता करा माफ!” या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, सरकार खरंच कर्जमाफी करणार आहे का, की हे फक्त निवडणुकीसाठी दिलेलं आश्वासन आहे?
सध्या ग्रामीण भागात अजित पवारांच्या या वक्तव्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकरी एका बाजूला सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवावा का, की अजित पवारांच्या शब्दांना गंभीरतेने घ्यावं, याबाबत संभ्रमात आहेत. सरकारने जाहीर केलेली तारीख पुढे आणखी वाढवली जाणार का, की खरंच त्या आधी कर्जमाफीचा निर्णय होणार? हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल. पण सध्या तरी पवारांच्या या विधानाने शेतकऱ्यांचा संयम कसोटीला लागला आहे, हे निश्चित.
हेही वाचा: EV Car Viral Video : दीड लाखांच्या ई-रिक्षाने ओढली 15 लाखांची टाटा नेक्सॉन EV; व्हिडिओ व्हायरल