राज्यातील ओल्या दुष्काळाने आणि अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या काळात झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी केंद्राने महाराष्ट्रासाठी 1,566.40 कोटी रुपयांचा दुसरा अग्रिम हप्ता मंजूर केला आहे. ही मदत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) अंतर्गत देण्यात आली असून, शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक आधार मिळणार आहे.
मराठवाडा, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकतेच शेतकऱ्यांसाठी 2,215 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली होती, त्यानंतर केंद्राकडून मिळालेला हा दुसरा हप्ता म्हणजे राज्याला मिळालेला मोठा दिलासा ठरतो.
हेही वाचा :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांसाठी एकूण 1,950.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 384.40 कोटी रुपये कर्नाटकसाठी आणि 1,566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी दिले जाणार आहेत. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधी (SDRF) च्या केंद्रीय वाट्याचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून वितरित करण्यात येत आहे.
हेही वाचा : Jaykumar Gore On Raj Thackeray: पराभव होण्यापूर्वीच कारणे शोधायला सुरुवात केली; जयकुमार गोरे यांची राज ठाकरे यांची टीका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे-
“मान्सूनमधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्राने एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी 1,566.40 कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. ही अग्रिम मदत असून, अंतिम हप्त्याची प्रक्रिया पुढे सुरू आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.”
केंद्र सरकारने यापूर्वीही देशातील विविध राज्यांना आपत्ती निवारण निधीच्या माध्यमातून मदत केली होती. 2025-26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 27 राज्यांना एसडीआरएफ अंतर्गत 13,603.20 कोटी रुपये तसेच 15 राज्यांना एनडीआरएफ अंतर्गत 2,189.28 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने याआधी जाहीर केलेल्या मदत पॅकेज अंतर्गतही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाणार आहे. केंद्राकडून मिळालेल्या या नव्या निधीमुळे मदत प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.