महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. आठ ते दहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून, या आपत्तीतून तातडीने दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने 2 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना प्राथमिक स्वरूपात प्रत्येकी 10 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस मूळ येथे कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी व प्रशासनातील अधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुढील दोन ते तीन दिवस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने संपूर्ण यंत्रणेला सतत सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “राज्य सरकारकडून प्रत्येक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे,” असे फडणवीस म्हणाले.
पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून विविध ठिकाणी कॅम्प उभारले आहेत. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून जेवण, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जनावरांसाठी चारा आणि छावणीची सोय करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी व इतर प्रभावित नागरिकांना अतिरिक्त मदत देण्यात येईल.
दरम्यान, हवामान खात्याने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः सोमवार आणि मंगळवार हे दिवस महत्त्वाचे ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बंगालच्या उपसागरातील वादळ कमी झाल्यानंतर परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. “आगामी दिवसांमध्ये सरकार आणि प्रशासन पूर्ण सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,” असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी घेतलेले तातडीचे निर्णय आणि आगामी दिवसांसाठी प्रशासनाला दिलेला सतर्कतेचा आदेश महत्त्वपूर्ण ठरत आहे.