मुंबई : महाराष्ट्रातील आरोग्य, पोषण, पाणीसंवर्धन आणि ग्रामीण उपजीविकेला अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. गुरुवारी दक्षिण मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात टाटा ट्रस्ट्ससोबत १२ आणि नाम फाउंडेशनसोबत एक अशा एकूण १३ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारांमुळे विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळे राज्यातील विकासप्रक्रियेला वेग मिळत असून योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे सुलभ होईल. आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणा हे राज्य सरकारचे प्राधान्याचे विषय असून, या क्षेत्रांत ठोस बदल घडवण्यासाठी अशा भागीदारी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, असे त्यांनी नमूद केले.
टाटा ट्रस्ट्ससोबत झालेल्या करारांमुळे मातृ व बालआरोग्य, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, कुपोषण व खुंटलेली वाढ रोखणे, तसेच पोषणातील वैविध्य वाढवणे या योजनांना बळ मिळणार आहे. याशिवाय टेलिमेडिसिनचा विस्तार, शहरी तसेच दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण, आणि एकात्मिक आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री दिलासा निधीअंतर्गत गंभीर आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त गरजू रुग्णांना आर्थिक मदत अधिक सुलभपणे मिळावी, हाही या करारांचा महत्त्वाचा उद्देश आहे. नागपूरमधील सहा नामांकित रुग्णालयांशीही करार करण्यात आले असून, त्याद्वारे गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ग्रामीण विकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, तसेच गडचिरोली जिल्हा प्रशासन या विभागांचा या सामंजस्य करारांमध्ये समावेश आहे. टाटा ट्रस्ट्स गेल्या दहा वर्षांपासून राज्य सरकारसोबत विविध उपक्रमांमध्ये कार्यरत असून, ही भागीदारी केवळ निधीपुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष सामाजिक परिणाम साधण्यावर लक्ष केंद्रित करते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, नाम फाउंडेशनसोबत झालेल्या कराराअंतर्गत पाणीसंवर्धनाच्या कामांना चालना दिली जाणार आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये तलाव-नद्यांचे गाळ काढणे, ओढे खोल-रुंद करणे, भूजल पातळी वाढवणे आणि मृदसंधारणाच्या कामांवर भर राहणार आहे. नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी राज्य सरकारसोबत सुरू असलेल्या या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी आरोग्य, शिक्षण, पोषण, उपजीविका, पाणी व स्वच्छता या क्षेत्रांमध्ये समन्वय साधून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हाच या भागीदारीचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. या करारांमुळे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.