आता महान व्यक्तींच्या नावाने ओळखल्या जाणार सरकारी शाळा! राज्यातील 25 तांत्रिक विद्यालयांचे नामांतर

माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारने राज्यातील तब्बल 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे.
आता महान व्यक्तींच्या नावाने ओळखल्या जाणार सरकारी शाळा! राज्यातील 25 तांत्रिक विद्यालयांचे नामांतर
Technical schools name change

महायुती सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने सरकारने राज्यातील तब्बल 25 शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता या सर्व शाळा महान स्वातंत्र्यसैनिक, ख्यातनाम वैज्ञानिक, विचारवंत, साहित्यिक आणि थोर समाजसुधारकांच्या नावाने ओळखल्या जाणार आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळणार आहे.

मुंबई शहर, ठाणे, पालघरसह विविध जिल्ह्यांमधील नामांतरित शाळांची नावे

या शासन निर्णयानुसार मुंबई शहर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या प्रमुख जिल्ह्यांमधील शासकीय तांत्रिक विद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबईतील धोबीतलाव येथील एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयाचे नाव बदलून आता ‘डॉ. जयंत नारळीकर शासकीय तांत्रिक विद्यालय’ असे करण्यात आले आहे. तसेच दादर येथील शाळेचे नाव ‘विश्वनाथ बेडेकर शासकीय तांत्रिक विद्यालय’ आणि विलेपार्ले (पश्चिम) येथील शाळेचे नाव ‘मोहनलाल चौहान शासकीय तांत्रिक विद्यालय’ करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ‘माधवराव ओक शासकीय तांत्रिक विद्यालय’, मुरबाड येथे ‘कृष्णा माळी शासकीय तांत्रिक विद्यालय’ आणि उल्हासनगर येथे ‘धरमपाल गुप्ता शासकीय तांत्रिक विद्यालय’ अशी नवी नावे देण्यात आली आहेत.

कोकण, खानदेश आणि इतर भागांतील विद्यालयांच्या नावातही बदल

या नामांतराच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पालघरमधील तलासरी येथे ‘महादेव अंधेर गुरुजी शासकीय तांत्रिक विद्यालय’ तर जव्हार येथे ‘नवसु दादा वळवी शासकीय तांत्रिक विद्यालय’ असे नाव देण्यात आले आहे. रत्नागिरीत ‘डॉ. धनंजय कीर’ व ‘वासुदेव जोशी’, तर रायगड जिल्ह्यात महाड येथे ‘सुरबानाना टिपणीस’, पेण येथे ‘जनरल अरुणकुमार वैद्य’ आणि रोहा येथे ‘पांडुरंग शास्त्री आठवले’ यांच्या नावे विद्यालय ओळखली जातील. सिंधुदुर्गातील शिरगावं येथील शाळेला ‘आप्पासाहेब गोगटे’ यांचे नाव मिळाले आहे.

हेही वाचा – ‘देशाला काही काळ पंतप्रधानच नसेल’; राज ठाकरेंची पुढील 5 महिन्यांबाबत मोठी भविष्यवाणी; नेमकं काय म्हणाले?

याशिवाय, उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये ‘डॉ. बाळकृष्ण मुंजे’, अहिल्यानगरमध्ये ‘अण्णासाहेब कदम’, धुळ्यात ‘वैद्य प्र. ता. जोशी’ व ‘नानासाहेब पाटील’, तर नंदुरबारमध्ये ‘बाल क्रांतिकारक शिरीषकुमार मेहता’ यांच्या नावाची नवी ओळख जोडण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातही डॉ. अविनाश आचार्य, डी. के. चौधरी, कविवर्य केशवसुत, भवरलाल जैन आणि दगडू राठोड यांसारख्या नामवंत दिग्गजांच्या नावे तांत्रिक विद्यालयांचे नामकरण करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version