पुणे: उन्हाळा अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वीच सूर्याने त्याचा 'रौद्र अवतार' दाखवण्यास सुरुवात केली आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या झळांनी संपूर्ण महाराष्ट्र आता अक्षरशः एखाद्या भट्टीत असल्यासारखा तापू लागला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्याची प्रखरता जाणवू लागते आणि दुपारपर्यंत जनजीवन विस्कळीत होण्याच्या स्थितीत येते. विदर्भापासून कोकणापर्यंत पसरलेला हा उन्हाचा चटका आता सामान्य नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहत असून, राज्याच्या अनेक भागांत उष्णतेची लाट सदृश स्थिती निर्माण झाली आहे.
राज्याचा विचार केला तर विदर्भ सध्या उष्णतेचा 'हॉटस्पॉट' ठरला आहे. अकोला शहरात तापमानाचा पारा 39.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, हे राज्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे. केवळ अकोलाच नव्हे, तर वर्धा (38.9), अमरावती (38.8) आणि ब्रह्मपुरी (38.6) येथेही सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. तेलंगणापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात बदल झाले असून, वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना घामाच्या धारांनी अंघोळ करावी लागत आहे.
दुसरीकडे, मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने 'येलो अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे 38.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, वाढत्या आर्द्रतेमुळे (Humidity) इथले हवामान कमालीचे उष्ण आणि दमट झाले आहे. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्येही उन्हाच्या झळांसोबतच असह्य उकाडा जाणवणार आहे. समुद्री वारे आणि वाढते तापमान यांच्या मिश्रणामुळे कोकणातील जनजीवन घामामुळे हैराण झाले असून, दुपारी घराबाहेर पडणे आता जिकिरीचे झाले आहे.
हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात मोठी कलाटणी; 10 ग्रॅमच्या नव्या किंमतीत मोठा ट्विस्ट
मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चढता क्रम राखत आहे. सोलापूरमध्ये 38.4 अंश सेल्सिअस, तर जळगाव आणि वाशीममध्ये 38 अंशांची नोंद झाली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पारा 36 अंशांच्या पार गेल्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यातच 'मे हीट'चा चटका बसू लागला आहे. विशेष म्हणजे, धुळ्यातील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 13.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असली तरी, दिवसाचा चटका मात्र तिथेही तीव्र आहे. तापमानातील ही तफावत नागरिकांच्या आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.
राष्ट्रीय पातळीवर पाहिले तर, ओडिशातील झरसुगुडा येथे देशातील सर्वाधिक 39.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानच्या फतेहपूरमध्ये देशातील निचांकी 11.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले असले, तरी देशाचा सपाट भूभाग आता हळूहळू उष्णतेच्या विळख्यात येत आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्यांची बदलती दिशा यामुळे उन्हाची तीव्रता अधिक काळ टिकून राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उन्हाचा हा तडाखा पुढील काही दिवस असाच कायम राहणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सुती कपड्यांचा वापर आणि मुबलक पाणी पिणे हाच या उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्याचा तूर्तास सुज्ञ मार्ग आहे.
हेही वाचा: Donald Trump Warning: ' इराण नंतर आता पुढचा नंबर...'; इराणला गुडघे टेकायला लावल्यानंतर ट्रम्प यांनी उघड केले पुढचे 'टार्गेट'