Weather Update: महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन झाले आहे . मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, तर विशेषतः बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
हवामान विभागाने सांगितले आहे की, सदर पाच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील, तसेच काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
राज्यातील पावसाची सध्याची स्थिती पाहता, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत. शहरांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पावसाळ्याच्या या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील नोंदी पाहता, राज्यात 20 सप्टेंबरपर्यंत सरासरी पावसाच्या 101 टक्के इतकी नोंद झाली आहे. पुणे व नाशिक विभागात पाऊस अपेक्षित प्रमाणापेक्षा कमी 80.8 आणि 84.3 टक्के नोंदला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात पावसाने सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच अनुक्रमे 120.4 , 111.8 आणि 108.2 टक्के नोंद केली आहे. कोकण विभागातही 94.5 टक्के पावसाची नोंद झाली आहे. एकूण राज्यभरात 956.2 मिमी पावसाची नोंद झाली असून, अपेक्षित 944.3 मिमी पेक्षा 101.3 टक्के पावसाचे प्रमाण आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. विशेषतः ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकांनी घराबाहेर जाण्याचे नियोजन अगदी गरजेप्रमाणेच करावे. पूरग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यामुळे घरे, शेत, रस्ते आणि वाहतूक यांवर परिणाम होऊ शकतो, म्हणून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
राज्यात मुसळधार पावसाचा सिलसिला अजून काही दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि सर्व नागरिकांनी आपले कार्यक्रम, प्रवास आणि कामकाज यांचा पूर्वतयारीने विचार करणे अत्यावश्यक आहे.