Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची आमदारकी टांगणीवर? या नेत्याने मांडलं संख्याबळाचं धक्कादायक गणित, राजकीय वर्तुळात खळबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पुनर्निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची आमदारकी टांगणीवर? या नेत्याने मांडलं संख्याबळाचं धक्कादायक गणित, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या दणदणीत विजयाने राजकीय समीकरणांना नवी कलाटणी दिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालात महायुतीचा विजयरथ सुसाट सुटलेला असतानाच, आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच बदलू लागले आहे. भाजप नेते आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील पुनर्निवडीबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, ठाकरेंच्या पुढील राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकज भोयर यांनी महायुतीच्या यशाचे श्रेय सरकारच्या लोककल्याणकारी कामांना दिले. "आजचा निकाल ही सरकारच्या कामाची पोचपावती आहे. जनतेने विरोधकांचे नकारात्मक राजकारण नाकारले असून, विरोधकांमध्ये समन्वयाचा मोठा अभाव आहे. महाविकास आघाडीची अशी भयानक अवस्था झाली असून, त्यामुळेच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असावा," असा टोला भोयर यांनी लगावला. मात्र, त्यांच्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे उद्धव ठाकरेंचे विधान परिषदेतील भवितव्य.

उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत मे 2026 मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भोयर यांनी संख्याबळाचा पाढा वाचत ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार, ठाकरे गटाकडे केवळ 20 आमदार शिल्लक आहेत.

हेही वाचा: Who is Narges Mohammadi: तुरुंगात असूनही संघर्ष कायम; नोबेल पारितोषिक विजेत्या नरगिस मोहम्मदींना पुन्हा साडेसात वर्षांची शिक्षा

विधान परिषदेची एक जागा जिंकण्यासाठी साधारणपणे 29 ते 30 मतांच्या कोट्याची आवश्यकता भासणार आहे. अशा परिस्थितीत आपल्या स्वबळावर उद्धव ठाकरेंना पुन्हा सभागृहात पोहोचणे अशक्य असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. "संख्याबळाअभावी उद्धव ठाकरे पुन्हा कोणत्याही सभागृहात दिसणार नाहीत," असे भाकीतही भोयर यांनी यावेळी वर्तवले.

सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंना पुन्हा निवडून येण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या अतिरिक्त मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र, महाविकास आघाडीत सध्या राज्यसभेच्या जागांवरूनही अंतर्गत धुसफूस आणि ओढाताण सुरू असल्याच्या चर्चा आहेत. 'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' अशी स्थिती ठाकरे गटाची झाली असून, मित्रपक्ष आपल्या वाट्याची मते ठाकरेंना देऊन त्यांना पुन्हा आमदार करणार का? हा कळीचा प्रश्न आहे. जर मित्रपक्षांनी पाठ फिरवली, तर उद्धव ठाकरेंना विधान परिषदेबाहेर राहावे लागण्याची दाट शक्यता आहे.

पंकज भोयर यांच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि महायुतीमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विजयाने महायुतीचा आत्मविश्वास दुणावला असताना, विरोधकांच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. उद्धव ठाकरे या राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी कोणती नवी खेळी खेळतात, की खरोखरच त्यांना सभागृहाबाहेर राहावे लागते, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास, पंकज भोयर यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात 'नंबर गेम'ची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

हेही वाचा: Navnath Waghmare : तेलंगणामध्ये फुलेंचा पुतळा हटवण्याचा प्रयत्न,नवनाथ वाघमारे यांची अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number