Wednesday, June 18, 2025 02:54:18 PM

Weather Update: मुसळधार पावसाचा तडाखा; महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रात जोरदार मान्सूनचं आगमन! सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत. प्रशासन सतर्क; नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन.

weather update मुसळधार पावसाचा तडाखा महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून राज्यातील विविध जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि बुलढाणा या सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. अनेक ठिकाणी नद्या-ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत तर काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सिंधुदुर्गात मान्सूनचे आगमन

सिंधुदुर्गात कालपासून मान्सूनची सुरुवात झाली आहे. रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर कायम होता. समुद्र खवळलेला असून 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पावसामुळे आंबा, काजू, कोकम यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Today's Horoscope: सोमवार काय घेऊन आलाय तुमच्यासाठी? वाचा राशीभविष्य

साताऱ्यात पूरस्थिती, पाणी घरात शिरले

साताऱ्याच्या फलटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे बानगंगा नदीने पूररेषा ओलांडली असून अनेक घरांत पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील 24 ठिकाणी पुलांवरून पाणी वाहू लागले आहे. काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून प्रशासन सतर्क राहण्याचे आदेश देत आहे. एका दुचाकी चालकाचा थरारक प्रसंगही समोर आला असून पुराच्या पाण्यात अडकलेला तो स्थानिकांनी वाचवला.

कोल्हापुरात 36.1 मिमी पावसाची नोंद

कोल्हापुरात गेल्या 24 तासांत 36.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला असून राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे प्रकार झाले आहेत.

संभाजीनगरमध्ये रिमझिम पाऊस व आजारांचे वाढते प्रमाण

संभाजीनगर जिल्ह्यात चार दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र यामुळे नागरिकांमध्ये सर्दी-खोकल्यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. आजही येथे यलो अलर्ट आहे.

नाशिकच्या सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस

सिन्नरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे देव व सरस्वती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही घरांत पाणी शिरले असून बसस्थानकातील स्लॅब कोसळल्याची दुर्घटनाही घडली आहे.

कराडमध्ये बंधारे ओव्हरफ्लो

कराड तालुक्यातील कोयना परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. निसरे, तांबवे बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत असून खोडशी डॅमही ओव्हरफ्लो झाला आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये वाहतूक विस्कळीत

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असून रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील सेवा 10 ते 15  मिनिटं उशिराने सुरु आहेत.

महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात आणि सुरक्षित राहावं, असा इशारा दिला जात आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.


सम्बन्धित सामग्री