राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजून निकाल हाती आल्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्तेच्या सारीपाटावरील चालींना वेग आला आहे. काही ठिकाणी स्पष्ट कौल मिळाला असला, तरी चंद्रपूर महानगरपालिकेत मात्र सत्तेचे गणित कमालीचे गुंतागुंतीचे झाले आहे. रविवारी 'मातोश्री'वर धाव घेणाऱ्या 10 नगरसेवकांचा गट आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला जाणार असल्याने चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. "जो महापौरपद देईल, त्याच्याच गळ्यात सत्तेची माळ घालू," या भूमिकेवर हा गट ठाम असल्याने प्रस्थापित पक्षांची झोप उडाली आहे.
चंद्रपूर मनपाच्या 66 जागांच्या निकालात काँग्रेस 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताचा 34 हा आकडा गाठताना त्यांची दमछाक होत आहे. दुसरीकडे, भाजप 23 जागांवर अडकल्याने त्यांनाही सत्तेसाठी बाहेरील मदतीची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे सहा, वंचित बहुजन आघाडीचे दोन आणि दोन अपक्ष अशा एकूण 10 नगरसेवकांनी एकत्र येत आपली वेगळी चूल मांडली आहे. या 10 नगरसेवकांच्या गटाने 'किंगमेकर'ची भूमिका स्वीकारल्याने चंद्रपूरच्या सत्तेची किल्ली सध्या त्यांच्याच हातात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा: Pune Railway Time Table: रेल्वेप्रवास करणाऱ्यांसाठी 'बॅड न्यूज'; 'या' रेल्वेगाड्या आता हडपसर स्टेशनलाच थांबणार कारण काय?
काल, रविवारी या शिष्टमंडळाने मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मात्र, महापौरपदाबाबत ठाकरे गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून अद्याप ठोस शब्द न मिळाल्याने हा गट नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीचा फायदा उठवण्यासाठी भाजपने आपली चक्रे फिरवली आहेत. आज दुपारी होणाऱ्या संभाव्य बैठकीत केवळ मुख्यमंत्रीच नव्हे, तर भाजपचे 'संकटमोचक' मानले जाणारे आमदार बंटी भांगडिया आणि स्थानिक राजकारणातील वजनदार नेते किशोर जोरगेवार यांची उपस्थिती सूचक मानली जात आहे. 'मातोश्री'वरून सुरू झालेला हा प्रवास 'वर्षा' बंगल्यावर सुफळ संपूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, भाजप या 10 नगरसेवकांच्या अटी मान्य करण्यास तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप मोठा त्याग करून महापौरपद या गटाला देण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर असे झाले, तर 23 जागा असूनही भाजप केवळ सत्तेत सहभागी होईल आणि 10 नगरसेवकांचा हा छोटा गट थेट महापालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होईल. यामुळे संख्याबळ कमी असूनही राजकीय वजनामुळे हा गट वरचढ ठरताना दिसत आहे.
सध्या चंद्रपूरच्या राजकारणात 'वेट अँड वॉच'ची स्थिती आहे. हे 10 नगरसेवक महाविकास आघाडीशी निष्ठा राखणार की मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सत्तेच्या नव्या समीकरणाची मांडणी होणार, याचा निकाल अवघ्या काही तासांत लागण्याची शक्यता आहे. या अनपेक्षित घडामोडींमुळे केवळ चंद्रपूरच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष या 10 नगरसेवकांच्या पुढील पाऊलाकडे लागले आहे. सत्तेच्या या रणधुमाळीत शेवटी चंद्रपूरचा 'गड' कोणाच्या ताब्यात जातो आणि शहराच्या प्रथम नागरिकपदी कोणाची वर्णी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा: Republic Day Parade 2026: कर्तव्यपथावर इतिहास घडला; 140 पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणारी 'ती' पहिली महिला अधिकारी कोण?