राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये आज, शनिवारी अध्यक्षपद आणि सदस्यपदांसाठी मतदान होत आहे. एकूण 143 सदस्यपदांच्या जागांसाठी ही निवडणूक असून, यासाठीचा प्रचार काल, शुक्रवारी रात्री 10 वाजता संपुष्टात आला. आज सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे.
या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यात आल्या आहेत. आज मतदान होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींसह, यापूर्वी 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या ठिकाणांची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व संबंधित ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, काही ठिकाणी उमेदवारांनी न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांवर वेळेत निर्णय न झाल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर या 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक, पालघर, ठाणे, अहिल्यानगर, जळगाव, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा अशा अनेक जिल्ह्यांतील नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. त्यामुळे राज्यभरात निवडणूक प्रक्रियेमुळे हालचालींना वेग आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, मतदारांचा कौल आणि रविवारी जाहीर होणारे निकाल स्थानिक राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.