महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या सकाळी साडे सात वाजल्यापासून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. राज्यभरात लोकशाहीच्या या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत असून, कार्यकर्ते आणि उमेदवारांची शेवटच्या क्षणांची धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अमरावती येथील एका मतदान केंद्राने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागांमधील 87 जागांसाठी उद्या मतदान होत असून, शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल येथील मतदान केंद्र विशेष आकर्षणाचा विषय ठरले आहे.
‘ग्रीन थीम’ मतदान केंद्र ठरले आकर्षण
पर्यावरणविषयक प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, मतदारांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचावा या उद्देशाने या मतदान केंद्रावर हरित (ग्रीन) थीम राबवण्यात आली आहे. हिरव्या रंगसंगतीचा वापर करत कृत्रिम झाडे, फुले आणि विविध वनस्पतींच्या माध्यमातून मतदान केंद्राचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मतदान कक्षांपासून भिंतींपर्यंत पर्यावरणपूरक सजावट करण्यात आल्याने संपूर्ण परिसर प्रसन्न आणि उत्साहवर्धक वाटत आहे.
हेही वाचा: Train Accident: धावत्या हायस्पीड रेल्वेवर कोसळली क्रेन... 22 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
मतदान केंद्रावर पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि हरित भविष्यासंदर्भातील स्लोगन्स, नारे आणि सुविचार ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला आपला लोकशाहीचा हक्क बजावताना सामाजिक जबाबदारीची जाणीवही व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
मतदान टक्केवारी वाढण्याची अपेक्षा
अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक संकल्पनेमुळे मतदारांना आनंददायी अनुभव मिळत असून, यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी माहिती दिली असून, हे ‘ग्रीन थीम’ मतदान केंद्र सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लोकशाही आणि पर्यावरण संवर्धन यांचा असा सुंदर संगम अमरावतीत पाहायला मिळत असून, हा उपक्रम इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो.
हेही वाचा: Raj Thackeray On EC : EVM सोबत ते 'पाडू' मशीन कशासाठी ? राज ठाकरेंचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप, मनसे सैनिकांना अलर्ट राहण्याचे आदेश