मुंबई: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी 2026 रोजी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली खरी, मात्र पहिल्या काही तासांतच प्रशासनाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहाने केंद्राबाहेर रांगा लावल्या असताना, अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड आणि ढिसाळ नियोजनामुळे संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः अनेक केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावण्यात येणारी 'शाई' संपल्याने थेट साध्या स्केच पेन किंवा मार्करचा वापर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
शाईऐवजी मार्करचा वापर; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह?
निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे बोटावर लावली जाणारी शाई. मात्र, मुंबईतील काही उपनगरीय केंद्रे आणि राज्यातील काही भागातील मतदान केंद्रांवर ही शाई वेळेवर उपलब्ध न झाल्याने कर्मचाऱ्यांनी चक्क काळ्या मार्करचा वापर केल्याचे चित्र दिसले. "मार्करची शाई तर धुवून टाकल्यावर लगेच निघते, मग बोगस मतदानाचे काय?" असा संतप्त सवाल मतदारांनी उपस्थित केला आहे. काही संवेदनशील केंद्रांवर यावरून मतदारांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राध्यक्षांना धारेवर धरले.
हेही वाचा: Maharashtra Election 2026 : महत्त्वाचे! मतदानाला सुरूवात पण आज काय बंद राहणार? वाचा एका क्लिकवर
ईव्हीएम पडले बंद; ताटकळले मतदार
एकीकडे शाईचा प्रश्न असताना, दुसरीकडे ईव्हीएम (EVM) मशीनच्या बिघाडाने मतदारांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला. मुंबईसह, नाशिक आणि कोल्हापूरमधील सुमारे 15 ते 20 केंद्रांवर तांत्रिक बिघाडामुळे मतदान तास-दीड तास उशिराने सुरू झाले. ताटकळत उभे राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल झाले. निवडणूक आयोगाने जादा कंट्रोल युनिट्स तैनात केल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात मशीन बदलण्यासाठी लागलेल्या वेळामुळे मतदानाचा वेग मंदावला होता.
यादीतून नाव गायब; 'डिजिटल इंडिया'मध्ये मतदार बेदखल?
दरवेळेप्रमाणे यंदाही 'मतदार यादी' हा सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी तक्रार केली की, त्यांच्याकडे ओळखपत्र असूनही यादीत नाव नाही. विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीत मतदान केलेल्या अनेकांची नावे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून गायब झाली आहेत.
राज्यात आज पंधरा हजार पेक्षा जास्त उमेदवारांचे नशीब आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. प्रशासकीय त्रुटींमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने या सर्व तक्रारींची दखल घेतली असून, ज्या ठिकाणी मार्कर वापरला गेला तिथे तात्काळ शाई पुरवण्याचे आदेश दिले आहेत.
लोकशाहीचा उत्सव आणि प्रशासनाचा कस?
एकूणच, कोट्यवधींचे बजेट असलेल्या या निवडणुकांमध्ये साध्या शाईची कमतरता आणि वारंवार होणारे ईव्हीएम बिघाड हे प्रशासनाचे अपयश मानले जात आहे. आता या सर्व गोंधळाचा फटका कोणत्या राजकीय पक्षाला बसतो आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतात, हे उद्याच्या निकालात स्पष्ट होईलच.
हेही वाचा: Tejasvee Ghosalkar: "अभिषेकची साथ आहे मला..." मतदानापूर्वी पतीच्या आठवणीने तेजस्वी घोसाळकर भावूक