नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) विशेष तपासणी मोहीम राबवली. दोन दिवसांत आठ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत खवा, कंदी पेढे, साधे पेढे आणि केशर पेढे असा एकूण 305 किलो साठा जप्त करण्यात आला, तर कलाकंद आणि पेढ्यांचा आणखी 210 किलो संशयास्पद साठा नष्ट करण्यात आला.
दसरा आणि पर्यटनाच्या हंगामामुळे विमान प्रवासाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईला जाण्यासाठी विमानाचे तिकीट 4,500 रुपयांवरून थेट 11 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. नवी दिल्लीसाठी 6,800 रुपयांऐवजी 14 हजार रुपये तर बेंगळुरूसाठी 6,400 रुपयांऐवजी 11 हजार 172 रुपये मोजावे लागत आहेत. हैदराबादच्या तिकिटाचा दरही 5 हजारांवरून 20 हजार रुपयांपर्यंत गेला आहे.
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे येथे विजय बंधारा बांधण्यात आला आहे. माजी उपसरपंच मिलिंद मोहिते आणि पत्रकार सचिन मोहिते यांच्या पुढाकारातून, देवरुखच्या मामासाहेब भुवड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने हा बंधारा उभारला. श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे पाणी साठवणुकीला मदत होणार असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेलाही बळ मिळणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी गोव्याच्या दिशेने मच्छी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही; मात्र मच्छीच्या मालाचे नुकसान झाले आहे. अंजणारी घाटातील अपघातप्रवण ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने, ते रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित झालेल्या नांदुरा रेल्वे स्थानकातच स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे! रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेची व्हिडिओ समोर आल्याने प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छतागृहांमध्ये घाण साचलेली असताना पाणीपुरवठ्याची स्थितीही बिघडली आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. आमचा राष्ट्रवादीबरोबर कुठलाच वाद नाही मात्र तटकरे यांचं नेतृत्व लोकांना मान्य नाही. प्रत्येक वेळी युक्ती करून स्वतःचं इप्सित साध्य करणे थांबवा आणि मार्गदर्शनाच्या भूमिकेत या असा सल्ला आमदार दळवी यांनी तटकरे यांना दिला.
राहुल गांधींच्या एका फोन कॉल नंतर माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपला भाजप प्रवेश नाकारला होता. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल दरम्यान करण्यात आले होते. भाजप प्रवेश जाहीर झाल्यानंतर संबंधित प्रकरणाची चौकशी आणि कारवाई थांबवण्यात आली होती.. मात्र पुन्हा एकदा आता राहुल बोंद्रे ना पोलिसांच्या नोटिसा आल्या आहेत.. त्यामुळे माझे कितीही नुकसान झाले तरी आता मागे हटणार नाही अशी भूमिका राहुल बोंद्रेंनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून जाहीर केली आहे.
दसरा सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेतकरी झेंडूची फुले विक्रीसाठी धुळे शहरात दाखल झाले आहेत. मात्र, झेंडूच्या फुलांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने वाहतूक खर्च आणि शेतीचा खर्च निघणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, झेंडूच्या उत्पादनातही घट झाली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे
मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात 25 वर्षीय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून राहुल सोमासे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.गरीब कुटुंबातील असलेल्या या तरुणाचे शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न होते त्यासाठी तो दिल्लीत जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होता.
भिवंडी पालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक पाच वतीने तक्रार केलेल्या भावे कंपाऊंड येथील खाऊ गल्ली येथील अतिक्रमणा वर कारवाई न करता जाणीव पूर्वक छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हातगाड्यांवर हेतुपुरस्कर कारवाई करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षक यांनी केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी पश्चिम विधानसभा प्रमुख प्रदीप बोडके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी 'पाणी वाचवा, जीवन वाचवा' या विषयावर भव्य जनजागृती रॅली काढली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमातून गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व आणि जलसंवर्धनाचा मोलाचा संदेश देण्यात आला. या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आकर्षक व अर्थपूर्ण पोस्टर्स हाती धरून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य गावकऱ्यांना पटवून दिले. तसेच घरोघरी जाऊन नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे व पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले. या पर्यावरणपूरक उपक्रमाला ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला
बिडकीन येथील फ्रिओ वेअरहाउसिंग प्रा. लि. आणि गंगापूर तालुक्यातील शिवराई येथे मराठवाडा कोल्ड स्टोरेज प्रा. लि. या दोन कोल्ड स्टोरेजवर FDA च्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून केलेल्या तपासणीनंतर मोठी कारवाई केलीय. छापा टाकलेल्या दोन्ही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली करीत साठवणूक करण्यात आलेला तब्बल 1 लाख 97 हजार 480 किलो संशयास्पद अन्नसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थाची किंमत सुमारे सव्वा चार कोटी रुपये एवढी आहे. दोन्ही संस्थांचे अन्न परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.
विजयादशमीच्या निमित्ताने धुळे शहरात छत्रपती संभाजीनगर व साक्री रोड परिसर रावण दहन समितीच्या वतीने यंदा 51 फुटी रावणाच्या दहनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील साक्री रोड परिसरातील विद्यावर्धिनी कॉलेजच्या प्रांगणात हा सोहळा पार पडणार आहे.या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत
20 ऑक्टोबर 2026 रोजी नागपूर येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ शांतता रॅली (शांती मोर्चा) आयोजित करण्यात आली आहे. बोधगया येथील ऐतिहासिक महाबोधी विहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध प्रतिनिधींच्या स्वाधीन करावे आणि बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 (BT Act 1949) रद्द करण्यात यावा, या मुख्य मागणीसाठी ही रॅली काढली जात आहे.
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिंमत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी हे तिघे कारने जळगावहून धरणगाव तालुक्यातील झुरखेडे या आपल्या गावी जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भयंकर होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद पालघरच्या वतीने रुग्णवाहिकेचे पालक मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, तसेच रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा आवश्यकतेनुसार मोठ्या रुग्णालयात दाखल करणे सुलभ व्हावे, या दृष्टीने रुग्णवाहिका सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.