भविष्यात पाणी टंचाईचे संकट आणि दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमध्ये पालकमंत्री वनराई बंधारा योजना राबवली जाणार असून महाड तालुक्यातील विन्हेरे येथे पालकमंत्री वनराई बंधारा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. रायगडचे पालक मंत्री भरतशेठ गोगावले, जिल्ह परिषद सदस्य निलेश ताठरे, पंचायत समिती सदस्य संदिप खिडबीडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील धाकटे शहापूर येथील प्राथमिक शाळेच्या वर्ग खोलीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला, यात निष्ठा मोकल ही आठ वर्षांची विद्यार्थिनी जखमी झाली. तिच्यावर पोयनाड इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. शाळेत 28 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या घटनेने इमारतीच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणे जिल्ह्यातील सासवड नगरपालिकेला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दणका दिला आहे. सासवड नगरपालिकेतील 230 कंत्राटी कामगारांचे 7 महिन्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ईएसआयचे (ESI) लाभ मिळत आहेत किंवा नाहीत, याची विशेष चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी नगरपालिकेची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीत भाजपने माघार घेतली असून, महाविकास आघाडीत उद्धवसेनेने बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सतीश चव्हाण यांच्यात थेट लढत होणार आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिलीप घुगे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात 38 उमेदवार असून, विभागातील 2 लाख 55 हजार 603 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काँग्रेसचे अभिजित वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे आणि नितेश कराळे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 445 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, निवडणुकीसाठी 2 हजार 535 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी करिता पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यातील 58 तालुक्यामधील 62 हजार महिला पुरुष शिक्षक मतदार 310 बुथवर आपला मतदानाचा हक्क बजावणार असून प्रमुख लढत भाजपचे कौस्तुभ गावडे, शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप, महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आणि रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यात आहे
पालघर सिन्नर मार्गावरील पालघरच्या वाघोबा खिंड परिसरात इको कार ला भीषण आग.आगीत कार जळून खाक.पालघरच्या दिशेने जात असताना कार मधून धूर निघायला सुरवात होताच चालकाने प्रसंगावधान राखत कार रस्त्याच्या कडेला उभी केली असता,वेळेत प्रवाशी कार मधून बाहेर पडल्याने जीवित हानी नाही.पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
शिवाजीनगर येथील नवीन रेल्वे मालधक्क्यावर मागील दीड महिन्यांपासून बंद असलेले काम जिल्हा हमाल पंचायत, सहाय्यक कामगार आयुक्त आणि हुंडेकरी यांच्यातील यशस्वी चर्चेनंतर पुन्हा सुरू झाले. माल धक्क्यावरील अपुऱ्या सुविधांच्या विरोधात हमाल माथाडी कामगारांनी काम बंद पुकारला होता. काल बैठकीनंतर जुन्या धक्क्यावर मालाच्या पूजनानंतर माल उतरविण्याच्या कामास सुरुवात झाली