एकनाथ शिंदेंच्या ऑपरेश टायगरनंतर राज्याचे राजकारण पुर्णपणे बदलले आहे. 6 खासदार फुटल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा राजकीय झटका बसला आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर फुटले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (29 जून) सभागृहात जाहीर केला आहे.
त्यानुसार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. सचिन आहीर पक्ष सोडल्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. यावेळी विधान परिषदेतील उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिंदेसेनेकडून सचिन अहिर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी अर्ज देखील भरला आहे.
यावेळी विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. ठाकरे गटाचे सचिन अहिर यांच्या मोठ्या राजकीय भूमिकेने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडल्याचे समोर आले आहे.
सचिन अहिर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. ठाकरे गटाने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. सचिन अहिर यांनी विधानसभेत वरळी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते. त्यामुळे सचिन अहिर यांच्या जाण्याने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
सचिन अहिर यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
सचिन अहिर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. शरद पवार यांनी त्यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना मंत्रिपद, मुंबई अध्यक्षपद अशा विविध जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यानंतर सचिन अहिर हे वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत सतत सावलीसारखे दिसायचे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा, तर विधानपरिषदेवर एकदा विजय मिळवला आहे. 1999, 2004 आणि 2009 या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी वरळी मतदारसंघातून विजय मिळवला.
2009 मध्ये त्यांची महाराष्ट्र सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. 26 जुलै 2019 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. 2020 मध्ये त्यांची अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. 2022 मध्ये त्यांची विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली. पण सध्याच्या पक्षांतराच्या लाटेत त्यांनी कठीण काळात उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आज 30 जून 2026 रोजी त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याच दिवशी, 30 जून 2026 रोजी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.