राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा मोठ्या प्रमाणात तापला आहे. त्यांच्या विमान अपघातावर शंकादेखील उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. अशातच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा सातत्याने उचलून धरत असून गेल्या 15 दिवसांत त्यांनी मुंबई व दिल्लीत अनेक पत्रकार परिषदा घेत या अपघातावर शंका उपस्थित केली. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. मात्र , तेथे पोलिसांनी एफआयर नोंदवण्यास नकार दिला. रोहित पवार व पोलिस यांच्यात बाचाबाची देखील झाली. त्यानंतर आज सकाळी रोहित पवार, युगेंद्र पवार तसेच अजित पवारांचे चुलत भाऊ राजेंद्र पवार हे बारामती पोलिस स्टेशनमध्ये आले. या अपघाताप्रकरणी त्यांनी बारामती पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याती मागणी केली. मात्र आजही पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. सुमारे 2 तास पोलिस स्टेशनमध्ये घालवल्यानंतर रोहित पवार हे पत्रकारांशी संवाद साधत होते.
दादांना ते विमान का दिलं’?
यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्यवस्थित का केली जात नाही? असा सवाल उपस्थित केला. अजित पवारांच्या मृत्यूला एक महिना होत आला तरीही अजून कोणत्याही प्रकारचा तपास का केला गेला नाही? अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाची चौकशी केली गेली तर ही का नाही? असा खडा सवाल केला.
पुढे ते म्हणाले की, ‘व्हीएसआर कंपनीकडून हलगर्जीपणा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक रिपोर्ट आला होता. बारामतीत गर्दी होईल म्हणून मुंबईत तक्रार केली. पण त्यांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. व्हीएसआरकडे लिअरजेटची 7 विमाने होती, त्यापैकी दोन विमानांचा अपघात झाला आहे. व्हीएसआर नियम पाळत नव्हती, असा डीजीसीएनेच ठपका ठेवलाय. व्हीएसआरची विमाने खराब होती तर दादांना ते का दिलं’? असा सवाल रोहित पवारांनी केला आहे. तसेच ‘व्हीएसआर कंपनी, मालक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करा’, अशी मागणी देखील आमदार रोहित पवारांनी केली आहे.