उष्णतेचा वाढता धोका! जगातील टॉप 50 Heat Risk शहरांमध्ये महाराष्ट्रातील ‘ही’ दोन शहरे; अहवालाने वाढवली चिंता

जगातील उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या 50 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूरचा समावेश झाला आहे.

उष्णतेचा वाढता धोका! जगातील टॉप 50 Heat Risk शहरांमध्ये महाराष्ट्रातील ‘ही’ दोन शहरे; अहवालाने वाढवली चिंता

हवामान बदलाचा परिणाम आता अधिक स्पष्टपणे जाणवू लागला असून, त्याचे गंभीर संकेत देणारा एक जागतिक अभ्यास समोर आला आहे. जगातील उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात भारतातील 14 शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर या दोन महत्त्वाच्या शहरांचाही या यादीत समावेश झाल्याने राज्यासाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.

'सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात जगभरातील 205 मोठ्या शहरांचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात वाढते तापमान, लोकसंख्येची घनता, आरोग्य सुविधा, आर्थिक स्थिती, हरित क्षेत्रांची उपलब्धता आणि नागरिकांची उष्णतेशी सामना करण्याची क्षमता अशा अनेक निकषांचा विचार करण्यात आला आहे.

या अहवालानुसार, इराकमधील अल बसरा हे शहर उष्णतेच्या धोक्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आहे, तर गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील एकूण 14 शहरांचा या यादीत समावेश असून महाराष्ट्रातील नागपूर आणि पुणे या शहरांनीही या यादीत स्थान मिळवले आहे.

विशेष म्हणजे, पुणे हे शहर वर्षानुवर्षे आल्हाददायक हवामानासाठी ओळखले जाते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे येथे संध्याकाळी थंड वारे वाहतात, त्यामुळे उन्हाळ्यातही तुलनेने सुखद वातावरण अनुभवायला मिळते. मात्र बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या नागरीकरणामुळे या शहरालाही उष्णतेचा धोका वाढत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

नागपूरमध्ये आधीपासूनच उन्हाळ्यात तीव्र उष्णता अनुभवायला मिळते. आता हवामान बदलाचा परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अभ्यासात नागरिकांचे वय, वातानुकूलन सुविधांची उपलब्धता, झाडांचे प्रमाण आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती यांसारख्या घटकांचाही विचार करण्यात आला आहे.

अभ्यासाच्या प्रमुख संशोधकांच्या मते, केवळ तापमान वाढ हेच धोक्याचे कारण नसून, शहरांची तयारी, आरोग्य व्यवस्था आणि नागरिकांची परिस्थिती यांचाही मोठा प्रभाव असतो. त्यामुळे उष्णतेच्या लाटांचा परिणाम अधिक गंभीर ठरू शकतो.

संशोधनात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे. जगभरात एअर कंडिशनरच्या वापरात वाढ होत असली तरी प्रत्येकाला ही सुविधा परवडत नाही. शिवाय, ऊर्जा वापरावर आधारित शीतकरण साधनांचा अतिवापरही जागतिक तापमानवाढीला चालना देऊ शकतो, असा इशाराही संशोधकांनी दिला आहे.

हवामान बदलाचे वाढते परिणाम लक्षात घेता, शहरांमध्ये हरित क्षेत्र वाढवणे, उष्णतेशी सामना करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती वाढवणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर या शहरांचा जागतिक यादीत समावेश झाल्याने आता स्थानिक प्रशासनासमोरही प्रभावी उपाययोजना राबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number