कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) वाहतुकीला बसला आहे. नागोठणेजवळील सुकेळी खिंड परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
महामार्गावर पाणी आल्यामुळे कोकणाच्या दिशेने जाणारी तसेच मुंबईच्या दिशेने येणारी वाहने जागच्या जागी अडकून पडली आहेत. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हजारो प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी महामार्ग विभागाच्या रस्ते बांधकामाच्या दर्जावर तसेच नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेली व्यवस्था अपुरी पडल्याने महामार्गावर पाणी साचल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.