मुंबई: राज्यात पावसाने जोर धरला आहे. बऱ्याच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर काही भागात पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली आहे.
नागपुरात मुसळधार पाऊस
नागपूरात बुधवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हसनबाग रोडवर एक फुटापर्यंत पाणी साचलं होतं. पावसामुळे रात्री नंदनवन कॅालनी, हसनबाग आणि परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं होतं. सिमेंट रोड उंच असल्याने रस्त्यावरचं पाणी लोकांच्या घरात शिरलं होतं. रात्री बारा ते एक वाजेपर्यंत लोकांच्या घरात पाणी होतं, त्यानंतर पाणी ओसरलं. बुधवारी रात्री 8.30 पर्यंत नागपुरात 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
वाशिममध्ये अनेक भागात जोरदार पाऊस
गेल्या अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर वाशिम शहरासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे वाशिम शहरातील नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. यामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अनेक भागात नाले तुडुंब भरले आहेत. नगरपालिकेकडून फक्त नाले साफ सफाईचा गव गवा केला जातो. प्रत्यक्षात मात्र काहीच दिसत नाही.
हेही वाचा : Today's Horoscope: एखाद्या विषयावर संभाषण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम, जाणून घ्या...
कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वत्र पावसाने जोर धरला असून जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली गेली असून राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 35 फुटावर आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर जुलै महिन्याच्या आधीच कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका संभवू शकतो.
आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस
शिरुरमधील आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यात चांगला पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे बळीराजाची शेतीच्या कामासाठी लगबग सुरु झालेली पाहायला मिळते आहे. आदिवासी शेतकऱ्यांकडून भुईमूगाची पेरणी होत आहे.
संभाजीनगरात पावसाची संततधार
छत्रपती संभाजीनगरात पावसाची संततधार सुरु असून पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. मात्र बुधवारी झालेल्या संततधार आणि अधूनमधून पावसाने जोर पकडल्यामुळे पिकांना अनुकूल पाऊस पडला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पेरणी केलेल्या पिकांना मोठा फायदा तर रखडलेली पेरणी पूर्ण होणार आहे.
हेही वाचा : Love Horoscope: तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप प्रेम मिळेल, तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा एक चांगला दिवस असणार
गोंदिया जिल्ह्यात पावसाची सुरूवात
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दळी मारून बसलेला पाऊस आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पावसाची रात्रीपासून रिप रिप सुरू झाली. आज सकाळी सुद्धा ती कायम आहे. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या पावसाने त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा आनंदित आहे आणि वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना सुद्धा आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.
मनमाड-चांदवड परिसरात पाऊस
मनमाडमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसापासून मनमाड चांदवड परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच आज सकाळपासूनच मनमाड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने याच पेरणी केलेल्या पिकांना फायदा होणार आहे.