Tuesday, February 17, 2026 07:46:21 AM

Solapur Civic Body Election Results 2026: एक्झिट पोलने वाढवली धडधड! सोलापुरात भाजप बहुमताच्या जवळ, पण काँग्रेसचे गणित काय?

एक्झिट पोलनुसार या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे.

solapur civic body election results 2026 एक्झिट पोलने वाढवली धडधड सोलापुरात भाजप बहुमताच्या जवळ पण काँग्रेसचे गणित काय

सोलापूर: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 29 महानगरपालिकांचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. काल, 15 जानेवारी रोजी सोलापूरकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. मात्र, निकाल जाहीर होण्यापूर्वीच खळबळजनक एक्झिट पोल समोर आला असून, सोलापुरात भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमतासह सत्तेची गदा हाती घेण्याची चिन्हे आहेत.

विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचे ‘कमळा’ला झुकते माप?

प्रचाराच्या रणधुमाळीत स्थानिक समस्यांपासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत अनेक मुद्द्यांनी सोलापूर ढवळून निघाले होते. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, सोलापूरकरांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपला कौल दिल्याचे स्पष्ट होत आहे. 62 जागांच्या संभाव्य आकड्यांसह भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे, महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही एक्झिट पोलमध्ये 15 जागा मिळवत शहरात आपली ताकद अधोरेखित केली आहे.

हेही वाचा: BMC Exit Poll Result 2026 : मुंबईत सत्तापालट? तर ठाण्यात शिंदेंनी गड राखला; एक्झिट पोल्सचे आकडे समोर

काँग्रेसचा बालेकिल्ला धोक्यात; प्रणिती शिंदेंना मोठा झटका

या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या सोलापुरात एक्झिट पोलनुसार पक्षाला केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपच्या झंझावातापुढे काँग्रेसची तटबंदी कमकुवत झाल्याचे हे संकेत असून, उद्याच्या निकालात हे आकडे कायम राहिल्यास सोलापूरच्या राजकारणात हा मोठा भूकंप ठरेल.

एक्झिट पोलनुसार पक्षनिहाय संभाव्य आकडेवारी

आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी (BJP) सर्वाधिक 62 जागा जिंकण्याचा अंदाज आहे. त्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) 15 जागांवर विजय मिळवू शकते, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) सुमारे 12 जागांवर समाधान मानू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चार जागा जिंकण्याची शक्यता वर्तवली जात असून, शिवसेना (ठाकरे गट) दोन जागांवर विजय मिळवू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि एमआयएम (AIMIM) प्रत्येकी एक जागा मिळवण्याचा अंदाज आहे. उर्वरित चार जागांवर इतर पक्ष व अपक्ष उमेदवार विजयी ठरू शकतात, असा पक्षनिहाय संभाव्य चित्र समोर येत आहे.

एक्झिट पोलचे हे आकडे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारे असले, तरी महाविकास आघाडीने मात्र प्रत्यक्ष निकालाबाबत आशावाद कायम ठेवला आहे. “निवडणूक निकालात नेहमीच अनपेक्षित वळणे येतात,” असे म्हणत विरोधकांनी संयम राखला आहे. आज 16 जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीत सोलापूरची सत्ता कुणाच्या हाती जाते आणि ‘स्मार्ट सिटी’चा कारभारी कोण ठरतो, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Pune Election Results 2026: ईव्हीएम उघडणार, भविष्य ठरणार; पुण्यात विजयाचा टिळा कोणाच्या कपाळी? आज निकालाचा 'सुपर फ्रायडे'


सम्बन्धित सामग्री

ताज्या बातम्या




ताज्या बातम्या