MSRTC CCTV Cameras : एसटी महामंडळाने कात टाकली! डिजीटल युगाच्या दिशेने एक पाऊल पुढे; बस डेपो ते विभागीय कार्यालये सर्व सीसीटीव्हीच्या निगराणीत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १११ कोटींची सीसीटीव्ही योजना सुरू केली आहे.

MSRTC CCTV Cameras : एसटी महामंडळाने कात टाकली! डिजीटल युगाच्या दिशेने एक पाऊल पुढे; बस डेपो ते विभागीय कार्यालये सर्व सीसीटीव्हीच्या निगराणीत

MSRTC CCTV Cameras: राज्यातील लाखो प्रवाशांचा विश्वास असलेल्या एसटी बससेवेत आता सुरक्षेच्या दृष्टीने मोठी क्रांती घडणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यभर अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी सुमारे १११ कोटी रुपयांचा भरीव निधी खर्च करण्यात येणार असून, बसस्थानके, आगार आणि विविध कार्यालयांमध्ये डिजिटल देखरेखीची व्यवस्था उभारली जाणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवते. ग्रामीण भागापासून ते महानगरांपर्यंत एसटी हीच सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येसोबत सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सक्षम उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत होती. याच पार्श्वभूमीवर हा व्यापक प्रकल्प राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल ६३३ ठिकाणी एकूण ७ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. बसस्थानके, आगार, विभागीय कार्यालये, मध्यवर्ती कार्यशाळा तसेच प्रशिक्षण केंद्रे अशा महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांचा या प्रकल्पात समावेश आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर त्वरित लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या विभागांतील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या टप्प्यामुळे सुरक्षाव्यवस्थेला नवी दिशा मिळाली असून, उर्वरित विभागांमध्येही काम जलद गतीने सुरू आहे.

या संपूर्ण योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई येथे उभारण्यात आलेला मध्यवर्ती नियंत्रण कक्ष. राज्यभरातील सर्व कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता येणार आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन आवश्यक ती कारवाई करता येईल. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ही योजना केवळ कॅमेरे बसवण्यापुरती मर्यादित नाही. एसटीच्या संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेला डिजिटल आधार देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रवाशांचा आत्मविश्वास वाढवणे, महिलांच्या सुरक्षेला बळकटी देणे आणि सार्वजनिक वाहतूक अधिक विश्वासार्ह बनवणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे एसटी महामंडळाने उचललेले हे पाऊल प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. येत्या काही महिन्यांत राज्यभर ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर लालपरीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number