Saturday, December 13, 2025 01:21:56 AM

ZP Election: निवडणुकांचं बिगुल वाजलं, 32 जिल्हा परिषद अन् 336 पंचायत समित्यांसाठी 'हा' दिवस ठरणार महत्त्वाचा

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला.

zp election निवडणुकांचं बिगुल वाजलं 32 जिल्हा परिषद अन् 336 पंचायत समित्यांसाठी हा दिवस ठरणार महत्त्वाचा

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सरगर्मी आता वाढू लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार, 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती यांचा समावेश असलेल्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी हाच निवडणुकांसाठी आधार म्हणून वापरण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की, विधानसभेच्या मतदार यादीत ज्या व्यक्तींची नावे आहेत, त्यांची नावे या निवडणुकांसाठी यादीत समाविष्ट केली जातील. 

जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निवडणूक विभागाकडून 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यांदींवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येईल. यात मतदारांचा चुकीच्या विभागात समावेश होणे, पत्ता चुकीचा टाकला जाणे, किंवा विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत न आढळणे अशा त्रुटींबाबत नागरिक आक्षेप नोंदवू शकतील. यादरम्यान, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, या प्रक्रियेत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करणे असे बदल करण्यात येणार नाहीत. याचं कारण म्हणजे, या निवडणुकांसाठी विधानसभेच्या यादींना मूळ मानले जाते. मात्र, प्रारुप यादींमध्ये तांत्रिक किंवा लेखनिक चुकांची दुरुस्ती मात्र केली जाणार आहे. 

हेही वाचा: Weather Update: कोकणात पाऊस सुरूच, मुंबईसह ठाण्याला पुन्हा अलर्ट, हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट समोर

27 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर होईल. या अंतिम यादीवरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडतील. या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजल्याचे स्पष्ट झाले आहे. गाव पातळीपासून ते अगदी जिल्हा पातळीपर्यंत राजकीय समीकऱणे बदलण्याची शक्यता असून विविध पक्षांनी आपल्या रणनीतींचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात या निवडणुकांना मोठे महत्त्व आहे. कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या संस्था थेट लोकांच्या विकासकामांशी संबंधित असतात. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा यांसारख्या सुविधा पुरवण्यात या संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. 

यामुळे, मतदार यादीची प्रक्रिया, आक्षेप नोंदविण्याची मुदत आणि अंतिम यादी जाहीर होण्याचा दिवस हे सर्वच टप्पे आता ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. येत्या काही दिवसांत मतदारांची हालचाल, आक्षेप नोंदणी आणि अंतिम यादी प्रसिद्धी या सगळ्या घडामोडींमुळे ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण अधिक रंगतदार ठरणार आहे. 


 


सम्बन्धित सामग्री