महाराष्ट्र: राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा अखेर संपली असून, हजारो उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील 30,209 शिक्षक पदांसाठी निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात दाखल झाली असून, पात्र उमेदवारांना पसंतीक्रम नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यापूर्वी शिक्षक अभियोग्यता, पात्रता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-2025) यशस्वीरित्या पार पडली होती. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार आता शिक्षक भरती केली जाणार आहे. यंदा दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी सुमारे 1.70 लाख उमेदवारांनी पात्रता मिळवली असून, आता या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळा, महानगरपालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यानिकेतने तसेच खासगी शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या मागणीच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील शिक्षकांच्या रिक्त जागा मोठ्या प्रमाणात भरल्या जाण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या विभागात किती जागा?
जिल्हा परिषद: 13,351
महानगरपालिका: 1,954
नगरपालिका: 280
आदिवासी विकास विभाग: 2,421
शासकीय विद्यानिकेतने: 56
खासगी शैक्षणिक संस्था : 12,148
यापैकी 10,328 पदांवर उमेदवारांची निवड मुलाखतीशिवाय, तर 19,881 पदांसाठी मुलाखत अनिवार्य असणार आहे.
इयत्तानुसार रिक्त जागा
या भरतीमध्ये प्राथमिक विभागाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
इयत्ता 1 ते 5: 14,320 पदे
इयत्ता 6 ते 8: 10,012 पदे
इयत्ता 9 ते 10: 5,513 पदे
इयत्ता 11 ते 12: 364 पदे
यामुळे प्राथमिक शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी यंदाची भरती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
पसंतीक्रम कसा भरायचा?
पात्र उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून उपलब्ध पदांचा अभ्यास करावा. त्यानंतर आपल्या पात्रता आणि पसंतीनुसार शाळा व पदांचा क्रम निश्चित करून 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत तो अंतिम (Lock) करणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतर पसंतीक्रमात कोणताही बदल करता येणार नाही.
पसंतीक्रम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रथम मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या पदांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात मुलाखत आवश्यक असलेल्या पदांची प्रक्रिया सुरू होईल.
भरतीसंदर्भात कोणतीही अडचण किंवा तांत्रिक समस्या आल्यास उमेदवार edupavitra25@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधू शकतात. तसेच शासनाच्या विद्यमान धोरणानुसार 80 टक्के पदांवर आरक्षणाचे नियम लागू राहतील.
राज्यातील शिक्षण क्षेत्रातील ही यंदाची सर्वात मोठी भरती मानली जात असून, हजारो पात्र उमेदवारांना शिक्षक म्हणून करिअरची संधी उपलब्ध होणार आहे.